पालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड सुरू असून बोरिवली येथील शताब्दी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांत दोन महिलांना उंदरांमुळे दुखापत झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मालाड येथील एक्सर तलावाजवळ राहणाऱ्या प्रमिला नेरुरकर (६८) यांना डाव्या बाजूला अर्धागवायूचा झटका आल्यामुळे शताब्दीमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास नाकाला लावलेल्या नलिकेवर चढून उंदराने त्यांच्या डाव्या डोळ्याचा चावा घेतला. प्रमिला यांनी आरडाओरड सुरू केल्याने शेजारील रुग्णाच्या नातेवाईकाने परिचारिकेला बोलावले.

उंदराने चावा घेतल्याने प्रमिला यांच्या डोळ्याला जखम झाली होती व त्यातून रक्त वाहू लागले होते. परिचारिका येथे हजर झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात ठिकठिकाणी उंदीर असल्याची माहिती रत्नाकर नेरुरकर यांनी दिली होती. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेरुरकर यांनी केला आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या स्वस्थतेबाबत दुर्लक्ष केले जात असून आठवडाभर रुग्णाच्या खाटेवरील चादरही बदलली जात नाही, अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेनंतर रविवारी शांताबाई नावाच्या महिला रुग्णाच्या पायाला उंदीर चावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

रुग्णालयातील उंदरांचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णालयात ४० पिंजरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबतही लक्ष दिले जात आहे. रुग्णालयांच्या खिडक्यांनाही जाळी लावून उंदरांवर नियंत्रण आणले जाईल.

-डॉ. प्रदीप आंग्रे, वैद्यकीय प्रमुख, शताब्दी रुग्णालय