वांद्रे पूर्व येथील गांधीनगर मॉडेल गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासात चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महापालिकेने मे. रुस्तमजी डेव्हलपर्सवर महाराष्ट्र नगररचना कायद्यान्वये (एमआरटीपी) नोटिस बजावण्यात आली आहे. महिन्याभरात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त न केल्यास या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे. पुनर्विकास प्रकल्पात एमआरटीपीअन्वये नोटिस क्वचितच बजावण्यात येते.
गांधीनगर येथे एमआयजी गट दोन या म्हाडा वसाहतींमध्ये विभाजन होऊन स्थापन झालेल्या मॉडेल गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास मे. रुस्तमजी डेव्हलपर्समार्फत सुरु आहे. ‘ओरियना’ या नावाने रुस्तमजी यांनी विक्री करावयाची आलिशान इमारत उभारली आहे तर ६४ रहिवाशांच्या सोसायटीची पुनर्विकास इमारत ऑक्टोबर २०१४ मध्ये गृहनिर्माण संस्थेच्या ताब्यात दिली आहे. पालिकेच्या इमारत व कारखाने विभागाच्या सहायक अभियंत्यांनी ८ जुलै रोजी एमआरटीपी अन्वये चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी नोटिस बजावली आहे. फ्लॉवर बेड, पॅसेज आणि चौक एरिया हा चटईक्षेत्रफळाच्या अंतर्गत न येणारा भाग बंदिस्त करण्यात आला आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे. हा अतिक्रमित भाग पाडून टाकण्यात यावा वा तो अधिकृत करून घ्यावा. मंजूर आराखडय़ानुसार इमारतीची रचना पूर्ववत करण्यात यावी. महिन्याभरात ही कार्यवाही न केल्यास एमआरटीपी अन्वये खटला दाखल करण्यात येण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. विक्री करावयाच्या इमारतीतही चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. या संदर्भात मे. रुस्तमजी डेव्हलपर्सचे बोमन इरानी यांच्याशी संपर्क साधला असता, पालिकेने एमआरटीपीअन्वये नोटिस बजावल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र ही नोटिस विक्री करावयाच्या इमारतीसाठी नव्हे तर पुनर्विकास झालेल्या इमारतीवर बजावण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला.