न्यायालयाचे मत; पोलिसांच्या कारवाईबाबत संदिग्धता!

अक्सा-मढ येथील ‘मुलराज खटाव ट्रस्ट’ची मालमत्ता बळकावण्यासाठी विश्वस्तांशी संगनमत करून बनावट पद्धतीने कागदपत्रे नोंदणीकृत केल्याच्या आरोपावरून विकासक समीर भोजवानी यांना रातोरात अटक करण्याच्या पोलिसांच्या कारवाईमुळे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या खटाव ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘खटाव ट्रस्ट’च्या पाली हिलमधील मालमत्तेप्रकरणी दाखल गुन्हा दिवाणी स्वरूपाचा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवत भोजवानी यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतरही याच ट्रस्टशी संबंधित मालमत्तेच्या दुसऱ्या प्रकरणात तात्काळ अटक होणे, या पोलिसांच्या कारवाईबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पहिल्यांदा आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली. याबाबत गुन्हा दाखल व्हावा यासाठी पन्ना खटाव यांनी हस्तक्षेप करून न्यायालयात प्रतिज्ञापत्रही केले. मात्र या प्रकरणात भोजवानी यांना अटकपूर्व जामीन मिळाला. हा जामीन अर्ज मंजूर करताना शहर दिवाणी व सत्र न्यायालयाने भोजवानी यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करीत हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदविले. १२ एप्रिल रोजी हा आदेश झाल्यानंतर १८ एप्रिल रोजी पन्ना खटाव यांचे दीर दिव्याकांत खटाव यांनी अक्सा-मढ येथील मालमत्तेबाबत स्वतंत्र तक्रार केली. या प्रकरणी घाईघाईत गुन्हा दाखल करून विकासक भोजवानी यांना रातोरात अटक करण्यात आली. मालमत्तांशी संबंधित एका गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मिळतो आणि दुसऱ्या गुन्ह्य़ात अटक करण्याची पोलिसांची कारवाई वादग्रस्त ठरली आहे. आर्थिक गुन्हे विभागात आतापर्यंत दाखल झालेल्या विविध गुन्ह्य़ात इतक्या तत्परतेने विकासकाला अटक करण्याची कारवाई झालेली नाही.

या तक्रारीत विश्वस्तांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती, विकासकाशी संगनमत करून ट्रस्टची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न, चंद्रकांत खटाव यांचा १९८८ मध्ये मृत्यू झाल्यानंतर ट्रस्टच्या मालमत्तांचे सर्व लाभधारकांमध्ये वाटप न होणे, सुनीत खटाव यांच्या बनावट सह्य़ा आदी आरोप आहेत. मात्र याबाबतच्या कागदपत्रांवर नजर टाकली असता, ट्रस्टच्या स्थापनेनंतर विश्वस्तांची नियुक्ती, निवृत्ती आणि राजीनामा आदींची ठरावांद्वारे नोंदणी करण्यात आल्याचे आढळून येते. ट्रस्टची मालमत्ता आणि वितरण याबाबतचा दावा दिवाणी न्यायालयात दशकापासून प्रलंबित आहे. १९६२ मध्ये चंद्रकांत खटाव यांनी त्यांचे पुत्र सुनीत खटाव यांच्या नावे मुखत्यारपत्र जारी केले होते. त्याला कधीही आक्षेप घेण्यात आला नाही. चंद्रकांत खटाव यांचे मुखत्यारपत्रधारक म्हणून सुनीत खटाव यांनी अनेक मालमत्तांसंबंधीच्या कागदपत्रांवर सह्य़ा केल्या. कायदेशीर प्रक्रिया म्हणून इतर विश्वस्तांनी यावर सह्य़ा केल्या, एवढाच त्यांचा संबंध असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. ही बाजू न तपासताच विकासक भोजवानी यांना अटक करण्याची कारवाई म्हणजे खटाव ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही दिसून येते.

वांद्रे आणि अक्सा बीच येथे मालमत्ता

‘सेठ मुलराज खटाव ट्रस्ट’च्या वांद्रे आणि अक्सा बीच येथे अनुक्रमे तीन व दोन मालमत्ता आहेत. या मालमत्तांबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने विकासक भोजवानी यांना अटक केली. अक्सा येथील मालमत्तेबाबत दाखल झालेल्या फिर्यादीत विकासक भोजवानी यांनी विश्वस्त दिलीप, महेंद्र आणि हितेन खटाव यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या मालमत्ता ३५ वर्षांपूर्वी विकल्या गेल्या आणि त्यातून मिळालेली रक्कम ट्रस्टच्या सर्व लाभधारकांना वितरित करण्यात आल्या असतानाही याबाबत उशिराने तक्रार होणे आणि पोलीस यंत्रणेकडून अशा तक्रारीला महत्त्व दिले जाणे, हे संदिग्ध असल्याचे या प्रकरणी अधिक माहिती घेतल्यावर आढळून येते.