सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. तर मुंबईचे पोलिसांनी बिहार पोलीस कोणतीही परवानगी न घेता तपास करण्यासाठी आल्याचं सांगितलं होतं. मात्र सुशांत प्रकरणामुळे दुरावलेले मुंबई आणि बिहार पोलीस एका लहान मुलासाठी एकत्र आले.

काय आहे प्रकरण?
बिहारमधील चंपारण येथून एका सात वर्षाच्या लहान मुलाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई आणि बिहार पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सर्वात प्रथम मुलाच्या कुटुंबाने बिहार पोलिसांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. कुटुंबाने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबरला बिहारमधील चंपारण येथून मुलाचं अपहरण झालं होतं.

कुटुंबाने १९ ऑक्टोबरला आपल्याला खंडणीचा फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी २० लाखांची खंडणी मागत मुलाच्या हत्येची धमकी दिली होती. तपास केला असता आरोपींनी मुंबईमधील कांदिवली येथून फोन केल्याचं समोर आलं. यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत मागितली. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २० ऑक्टोबरला रियासुद्दीन अन्सारी याला अटक केली. अटक करुन त्याला बिहार पोलिसांकडे सोपवण्यात आलं.

रियासुद्दीन अन्सारीचा कॉल रेकॉर्ड तपासला असता बिहार पोलिसांना त्याचे साथीदार अलाउद्दीन अन्सारी, खान मोहम्मद अन्सारी यांच्यासहित एकाची माहिती मिळाली. यामधील एकाने मुलाला उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे लपवून ठेवल्याचीही पोलिसांना माहिती मिळाली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांकडून सुटका कऱण्यात आली आहे. आरोपी खान मोहम्मद अन्सारी याला आपलं कर्ज फेडायचं असल्यानेच त्याने अपहरण केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बिहार पोलिसांनी सर्व चार आरोपींना अटक केली आहे.