सूर्याकडून आलेली उष्णता जमिनीत शोषली जाते व नंतर परावर्तितही होते. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाजवळ तापमान अधिक असते व वातावरणाच्या वरच्या थरात तापमान कमी होत जाते. डोंगराचे टोक हे जमिनीपासून जेवढे दूर तेवढीच तेथील हवा तुलनेने अधिक थंड होते. त्यामुळे हिवाळ्यातही डोंगराळ भागातील दिवसाचे म्हणजे कमाल तापमान पठारापेक्षा कमीच राहते.

पुढील महिन्यातील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण गरम असले तरी सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती थंडीची. अवघ्या महिना-दीड महिन्यासाठी मुक्कामाला येत असलेल्या गुलाबी वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत तापमान दहा अंश से.च्या पुढे-मागे झुलते आहे. त्यातच महाबळेश्वरच्या वेण्णा तलाव परिसरात गोठलेल्या दवबिंदूंची शुभ्र चादर पसरल्याची छायाचित्रे सर्वत्र झळकली. महाबळेश्वरला ‘बर्फ पडल्या’च्या या बातम्या दर वर्षीच येतात. मात्र त्याच वेळी महाबळेश्वर व मुंबईचे किमान तापमानही एकसारखेच म्हणजे १० अंश से.च्या पुढे असते. पुणे, नाशिक, अहमदनगर या राज्याच्या उत्तर भागात व विदर्भातही अनेक वेळा तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी असल्याची नोंद होते. हल्ली काय, हवामानाचे ठीक चाललेले नाही, असा विचार येऊ शकतो, पण खरे तर अनेक दशके तापमानाच्या नोंदी याच प्रकारच्या आहेत. यामागे नेमके काय कारण आहे?

सर्वात आधी किमान व कमाल तापमान दिवसाच्या कोणत्या वेळी नोंदले जाते, हे माहिती हवे. अगदीच अपवादात्मक स्थिती वगळता साधारण सकाळी, सूर्योदय होत असताना तापमान सर्वात कमी असते तर दुपारी सूर्य माथ्यावरून पश्चिमेला कलू लागल्यावर तापमान सर्वाधिक पातळी गाठते. महाबळेश्वर, पाचगणी किंवा दक्षिणेतील उटीसारख्या डोंगराळ प्रदेशात वर्षभर आजूबाजूच्या परिसरापेक्षा तापमान कमी असते. सूर्याकडून आलेली उष्णता जमिनीत शोषली जाते व नंतर परावर्तितही होते. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाजवळ तापमान अधिक असते व वातावरणाच्या वरच्या थरात तापमान कमी होत जाते. डोंगराचे टोक हे जमिनीपासून जेवढे दूर तेवढीच तेथील हवा तुलनेने अधिक थंड होते. त्यामुळे हिवाळ्यातही डोंगराळ भागातील दिवसाचे म्हणजे कमाल तापमान पठारापेक्षा कमीच राहते. रात्रीच्या तापमानाचे गणित मात्र वेगळे असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाने दिवसा शोषलेली उष्णता रात्री हवेत सोडली जाते. पण दिवसा उत्तरेकडून थंडगार वारे येत असल्याने जमीन तापत नाही. त्यातच आकाश निरभ्र असेल तर ढगांमुळे अडवून धरली जात असलेली उष्णताही वेगात वातावरणाबाहेर पडते. या स्थितीमुळे डोंगराळ, पठारावरील किंवा किनाऱ्यावरील किमान तापमानात फारसा फरक पडत नाही. त्यातच वारे वायव्येकडून वाहत असल्यास त्याचा अधिक प्रभाव मुंबईवर पडतो. त्यामुळेच हिवाळ्यात काही वेळा महाबळेश्वरपेक्षा मुंबईचे सकाळचे तापमान खाली जाऊ शकते.

सध्या मध्य महाराष्ट्रात तापमान अधिक खाली गेले आहे. नागपूर, अमरावती परिसरात त्यामानाने किमान तापमान अधिक आहे. याला कारण ठरतात ते वारे. उत्तर भारतात पश्चिमेकडून थंड वारे येतात व काही वेळा बर्फही पडतो. महाराष्ट्रात येणाऱ्या वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून असली की मध्य महाराष्ट्रासोबत विदर्भही गारठतो. मात्र आता वारे वायव्येकडून म्हणजे राजस्थानच्या दिशेने आहेत. हे वारे आधी मध्य महाराष्ट्रात पोहोचतात. विदर्भापर्यंत पोहोचेपर्यंत या वाऱ्यांचा प्रभाव काहीसा उणावतो. गेल्या महिन्याभरातील थंडीच्या बातम्या पाहिल्या की लक्षात येईल की उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर येथे सर्वात किमान तापमानाची नोंद होत आहे. दर वर्षी अहमदनगर हे थंडीच्या काळात बातम्यांमध्ये पुढे येते. खरे तर अहमदनगरपेक्षा नाशिक हे अधिक हिरवेगार किंवा थंड म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र अहमदनगर येथील थंडीतील तापमान हे नाशिकपेक्षा अनेकदा खाली जाते. याचे कारण तेथील कोरडा व काहीसा ओसाड प्रदेश. दुपारच्या सूर्यकिरणांची उष्णता जमिनीने शोषून घेतली तरी मावळतीनंतर ती त्वरेने बाहेर टाकली जाते. वातावरणात ही उष्णता धरून ठेवण्यासाठी बाष्प नसले किंवा हरितगृहासारखा परिणाम साधणारे ढग नसले की हवा लगेच थंड होते. वाळवंटी प्रदेशात त्यामुळेच रात्री व दिवसाच्या तापमानात प्रचंड फरक असतो. मुंबई तसेच कोकण किनारपट्टीवर याच्या उलट स्थिती असते. समुद्राच्या सान्निध्यामुळे हवेत भरपूर बाष्प असते. त्यामुळे दिवसा व रात्रीच्या तापमानात कमी फरक असतो.

आता पुन्हा महाबळेश्वरकडे येऊ. महाबळेश्वरमध्ये या दिवसात शुभ्र हिमकणांची चादर पसरलेली दिसते. किमान तापमान १० अंश से. हून अधिक असताना बर्फ पडण्याची शक्यता नाहीच. या हिमकणांना कारणीभूत ठरते ते दविबदूंचे गोठलेले तापमान. महाबळेश्वरमधील हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. विशेषत: तलावाच्या तसेच धबधब्याच्या ठिकाणी हवेतील वाफेचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी जमिनीकडचे तापमान ४ अंश से.पर्यंत खाली उतरले की दविबदूंचे रूपांतर हिमकणांमध्ये होते. जमीन थंड असली तरी तापमापकाच्या नोंदीत मात्र तापमान १० अंश से.पलीकडचा आकडा दाखवत असते. याचे कारण म्हणजे हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी जगभरात वापरण्यात येणारी पद्धत. पाऊस, तापमान यांच्या नोंदी घेणारी यंत्रे ही जमिनीपासून चार फूट अंतरावर असतात. त्यामुळे जमिनीला लगटून असलेल्या हवेचे तापमान या मापकांमध्ये दर्शवले जात नाही.

हवामानाशास्त्र विभागातील तापमानाच्या नोंदी या शास्त्रीय आधारावर केल्या जातात. मात्र काही वेळा या नोंदी व अनुभव यात फरक पडतो. उन्हाळ्यात पुण्याच्या कोरडय़ा हवेतील ३८ अंश से. हे मुंबईतील घामाच्या धारा काढणाऱ्या ३४ अंश से.पेक्षा अधिक सुसह्य़ असतात. थंडीतही मुंबई व महाबळेश्वरमध्ये हाच अनुभव येतो.

prajakta.kasale@expressindia.com