News Flash

नगरसेवकांच्या ‘बेस्ट’वाऱ्यांचा हिशेब वाऱ्यावर

बेस्टचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रसाद रावकर

मोफत प्रवास सुविधेचा अनेकांकडून लाभ; होणाऱ्या खर्चाची ‘बेस्ट’कडे नोंदच नाही

मुंबई : मुंबईमधील विविध प्रभागांमधून निवडून येणारे, नामनिर्देशित नगरसेवक आणि शिक्षण समितीवरील बिगर महानगरपालिका सदस्यांना बेस्टकडून मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येते. मात्र नगरसेवकांच्या बस प्रवासावर किती खर्च होतो याचा हिशेबच बेस्टकडे नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या मोफत बस पाससाठी अर्थसंकल्पातही तरतूद नसल्याचे उजेडात आले असून सातत्याने तोटा वाढत असलेल्या बेस्टचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

बेस्ट उपक्रम मुंबई महापालिकेचे एक अंग आहे. नियमाच्या मूळ मसुद्यात बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून स्वातंत्र्यसैनिकांव्यतिरिक्त अन्य कुणालाही मोफत प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. मात्र, पालिका प्रभागांमधून निवडून येणारे, तसेच नामनिर्देशित नगरसेवकांना कामानिमित्त फिरावे लागते. ठिकठिकाणी जाऊन पालिकेची कामे, नागरी समस्यांची पाणी करणे, नागरिकांच्या भेटी-गाठी घेणे, निरनिराळी कामे आणि बैठकांच्या निमित्ताने पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयात जावे लागते. त्यामुळे निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक आणि नामनिर्देशित नगरसेवकांना १९५० पासून बेस्टच्या बसगाड्यांमधून फुकट प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण समितीवर नियुक्त बिगर महानगरपालिका सदस्यांनाही बेस्ट बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली असून त्याबाबतची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. १९५० पासून आतापर्यंत झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या, तसेच नियुक्त नामनिर्देशित नगरसेवक व बिगर महानगरपालिका सदस्यांना मोफत बस प्रवासासाठी बेस्टकडून पास दिला जातो. पासधारकांमध्ये प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरील नगरसेवकही आहेत. या प्रभाग अध्यक्षांना पालिका वाहन उपलब्ध करून देते. तरीही त्यांनी बेस्टचा मोफत पास घेतला आहे. मात्र, साधारण १९५० पासून आतापर्यंत बेस्ट बसमधून नगरसेवकांनी केलेल्या प्रवासामुळे किती खर्च आला याची माहितीच बेस्ट उपक्रमाकडे नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा तोटा सातत्याने वाढत आहे. अशा वेळी बेस्ट उपक्रमाने खर्चाचा ताळेबंद काटेकोरपणे राखणे गरजेचे आहे. परंतु नगरसेवकांवर होणाऱ्या खर्चाची आकडेवारीच बेस्टकडे नसल्याने उपक्रमाचा आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

नगरसेवकांच्या मोफत प्रवासापोटी बेस्ट उपक्रमाला किती खर्च येतो याची माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहितीचा अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी बेस्ट उपक्रमाकडे अर्ज केला होता. मात्र उपलब्ध झालेल्या माहितीवरून बेस्टकडे खर्चाची ठोस आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले आहे

तीन वर्षांत ९५ लाखांहून अधिक खर्च?

बेस्ट भवनमधील सचिव कार्यालयातून नगरसेवकांच्या बस प्रवासावर होणाऱ्या खर्चाची ढोबळ आकडेवारी देण्यात आली होती. त्यानुसार १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२१ या तीन वर्षांमध्ये बेस्टला ९५ लाख ८९ हजार ६३४ रुपये इतका खर्च सोसावा लागला. परंतु खर्चाची ही आकडेवारी ठोस नसून त्याबाबत या विभागाने बेस्टच्या अर्थसंकल्पीय विभागाकडे विचारणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय विभागात चौकशी केली असता या संदर्भात अर्थसंकल्पात तरतूद नसल्यामुळे नगरसेवकांच्या प्रवास खर्चाची ठोस आकडेवारी देण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आल्याचे आनंद भंडारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

१४२ नगरसेवक लाभार्थी

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये निवडून आलेल्या २२७, पाच नामनिर्देशित आणि शिक्षण समितीवरील बिगर महानगरपालिका सदस्य अशा एकूण २३४ पैकी १४२ नगरसेवकांनी बेस्टचा बस पास घेतला आहे. तब्बल ९० नगरसेवकांनी ही सेवा घेण्यास नकार दिला आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती गंभीर झाल्यामुळे भाजपच्या ८३ नगरसेवकांनी मोफत बस प्रवासाची सेवा घेण्यास नकार दिला होता. अन्य काही पक्षांतील सात नगरसेवकांनीही ही सेवा नाकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:02 am

Web Title: mumbai best bus coroporter akp 94
Next Stories
1 औषध दुकानांतील कर्मचाऱ्यांची परवड
2 “आता वस्त्रहरण अटळ आहे”, सचिन वाझेंच्या आरोपांवरून भाजपाचा अनिल परब यांना खोचक टोला!
3 “मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो…” सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका!
Just Now!
X