पहिल्याच पावसात मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या बेहराम पाडा भागात असलेल्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वांद्रे पूर्व परिसरात येणाऱ्या बेहराम पाडा भागात रात्री (६ जून) दोन वाजता इमारतीचा काही भाग कोसळला. बेहराम पाडातील चार मजली रज्जाक चाळ आहे. चार मजली इमारतीत छताचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आलं. जवळपास ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती त्यांनी दिली. या दुर्घटनेत मृत्यू झालेली व्यक्ती मूळची बिहारची होती. एका महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, तिला टाके पडले आहेत. तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. इमारत कोसळल्यानं मोठा माती आणि विटांचा ढिगारा पडला आहे. तो हटवण्याचं काम महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून करण्यात आलं आहे, अशी माहिती सिद्धीकी यांनी दिली.

खेरवाडी रोडवर घराची भिंत कोसळली

बेहराम पाडा भागातील दुर्घटनेवेळी वांद्रे पूर्वमध्ये असलेल्या खेरवाडी रोड परिसरात एका घराची भिंत कोसळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेत पाच नागरिक जखमी झाले आहेत. तर १७ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असल्याचंही मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.