अलगीकरण केलेल्यांसह आस्थापना, प्रार्थनास्थळांच्या प्रमुखांविरोधात कारवाई

मुंबई : करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ११२ गुन्हे नोंदवले आहेत. यात दोन आठवडय़ांसाठी घरी राहाण्याच्या सूचना असलेल्या व्यक्तींसह प्रार्थनास्थळांचे प्रमुख, दुकान आणि हॉटेल मालकांचा समावेश आहे.

पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार १३मार्चपासून करोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध प्राधिकाऱ्यांनी र्निबध जारी केले. त्यात फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमान्वये संचारबंदी, जमावबंदीचे आदेशांचाही समावेश आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेतील १८८ कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधीत आरोपीला एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

करोनाचे संशयीत म्हणून दोन आठवडय़ांसाठी घरी राहाण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी देऊनही बाहेर भटकणाऱ्या तिघांविरोधात शहराच्या विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. बंदर विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २० मार्चला तीन व्यक्ती दुबईहून परतल्या. त्यापैकी दोघे तेथे नोकरी करत होते तर तिसरा आपल्या भावाला भेटण्यासाठी तेथे गेला होता. तिघांना दोन आठवडय़ांसाठी घरी थांबण्याच्या सूचना होत्या. विलगीकरणासाठी त्यांची साकिनाका, अंधेरी आणि गोरेगाव येथे व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांना त्यांच्या मूळगावी, झारखंड येथे धाडण्यासाठी शासनातर्फे सोयही केली जात होती. मात्र हे तिघे कोणालाही न कळवता तेथून वडाळा येथे वास्तव्यास असलेल्या मित्राच्या घरी आले. ही बाब वडाळा पोलिसांना समजताच त्यांनी तिघांना ताब्यात घेतले आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पवई येथील विलगीकरण केंद्रात धाडले. आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे डॉ. करंदीकर यांनी स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त १६ हॉटेल, ६ पान टपऱ्या, ५३ अन्य दुकाने, १८ फेरिवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेश धुडकावून लावणाऱ्यांविरोधात १० तर अवैधरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांविरोधात ६ गुन्हे नोंदवण्यात आल्याचे उपायुक्त अशोक यांनी सांगितले. सोमवारी डोंगरीच्या टेमकर स्ट्रीट येथील मशिदीत नमाज पठणासाठी दिडशे जणांचा जमाव जमला होता. ही माहिती मिळताच डोंगरी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी समजूत काढून जमाव पांगवला. तसेच पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने मशिदीच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा नोंदवला.

चोप, उठाबशा..

राज्यभर लागू संचारबंदी आणि शहरात लागू जमावबंदी आदेश असूनही किंवा सामाजजिक जाणीव न ठेवता रस्त्यांवर गर्दी करणारे स्थानिक पोलिसांनी अक्षरश: नाकी नऊ आणत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पोलीस वाहन दिसताच गर्दी पांगते. मात्र पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा त्या ठिकाणी गर्दी जमा होतो. हा अनुभव घेतलेल्या पोलिसांनी सोमवारपासून समजूत काढण्यासोबत सौम्य बळाचा वापर सुरू केला. रस्त्यांवर गर्दी दिसताच ती पांगावताना हाती लागलेल्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. काहींना तिथल्या तिथे उठाबशा काढाव्या लागल्या.