दिल्लीमध्ये करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल पाच महिन्यानंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील लोकल सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केली जात आहे. आवश्यक सेवेतील आणि महिलांसाठी लोकल सुरू केल्यानंतर आता सर्वसामान्यांनाही लोकलचे दरवाजे खुले करण्याचे नियोजन सरकारकडून सुरू आहे. मात्र, हा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील करोना परिस्थितीविषयी माहिती दिली. मुंबईत वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येवर चहल यांनी चिंता व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त चहल म्हणाले,”मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही,” असं आयुक्त चहल म्हणाले.

मुलांना धोक्यात टाकू शकत नाही

३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावर बोलताना आयुक्त चहल म्हणाले,”पूर्व तयारीवर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळेच ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. नेहमीच बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी योजना आखतो आणि चांगलं करण्याचा विचार करतो. त्यामुळे एकाही मुलाला धोक्यात टाकायचं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला. सध्या शाळा बंद आहेत आणि बंदच राहतील. शाळा सुरू होत्या आणि आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी बाब नाही,” असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.