मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा आणि वडिलांचा करोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. हे कुटुंब मुंबईत चाळीमध्ये राहते.

विमानतळावर डयुटी बजावत असताना, आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून सुरक्षा रक्षकाला करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे आणि त्याच्यामार्फत हा संसर्ग कुटुंबियांपर्यंत पोहोचला असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईसह सांगली, नवी मुंबई, वसई, पुणे, ठाणे आणि साताऱ्यात करोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. एअरपोर्टवरील या सुरक्षा रक्षकाने लोकल ट्रेनने प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्या आईला भेटण्यासाठी त्याने लोकल ट्रेनमधून प्रवास केला.

करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात त्याची चाचणी करण्यात आली. २१ मार्चला त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तात्काळ त्याच्या कुटुंबियांना व त्यांच्या संपर्कात असलेल्यांना करोना चाचणीसाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. या सुरक्षा रक्षकाचे कुटुंब चाळीमध्ये राहते.

घरामध्ये बाथरुम असल्यामुळे सार्वजनिक शौचालयातून संसर्ग होण्याची भिती नाही असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी सुरक्षा रक्षकाची आई आणि काही नातलगांना जोगेश्वरीच्या ट्रामा हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले. मुंबई महानगर क्षेत्रात जे १० नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यांचा करोनाची आधीपासून लागण झालेल्यांबरोबर अत्यंत जवळचा संपर्क होता असे एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.