‘मुंबई फर्स्ट’कडून शासनाला सूचना

मुंबई : वातावरण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी ठोस आराखडय़ाची गरज असून त्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात यावी, तसेच जल प्रलयापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईभोवती तटबंदी बांधण्याचा उपाय समोर आला आहे. ‘मुंबई फर्स्ट’ या विचारमंचाने याबाबत शासनाला सूचना दिल्या आहेत.

वातावरणातील बदल आणि तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन समुद्र किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याचे भाकीत करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भाग समुद्र गिळंकृत करण्याचेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर संभाव्य धोक्याना तोंड देण्यासाठी मुंबई फर्स्टने शासनाला काही उपाय सुचवले आहेत.

समुद्राच्या बाजूला भिंत

मुंबईत भरतीच्यावेळी शिरणाऱ्या पाण्यामुळे अनेक भाग जलमय होतात. येत्या काळात ही समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला अटकाव करण्यासाठी समुद्राच्या बाजूला धरणाप्रमाणे भिंत बांधण्याचा उपाय सुचवण्यात आला आहे. यामुळे शहरात शिरणारे पाणी अडेल आणि शहरातील पाणी उदचन यंत्रणेच्या माध्यमातून बाहेर काढता येईल. याच बरोबर पूरस्थिती, हवामान याचे अचूक पूर्वानुमान देणारी यंत्रणाही सक्षम करणे आवश्यक आहे असे मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर यांनी सांगितले.

वातावरणासाठी घातक असलेल्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आणि ठोस आराखडा आणि योग्य अंमलबजावणीसाठी कृतिदलाची स्थापना करणे असे उपायही सुचवण्यात आले आहेत. पालिका आयुक्त हे या कृती दलाचे अध्यक्ष असतील. स्थानिक व वैश्विक वातावरण बदलाविषयीचे तज्ज्ञ, धोरण तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रातील तज्ज्ञ यांचा या दलात सहभाग असावा, असे सुचवण्यात आले आहे. वातावरण विषयक माहितीच्या संकलनासाठी आणि निरीक्षणासाठी एका विशेष केंद्राची निर्मिती करणे, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक स्तरावर यंत्रणा उभी करणे, त्याचबरोबर शेतीचे संरक्षण, शहरातील पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. गेल्या काही वर्षांत वारंवार आलेल्या नैसर्गिक आपत्तींची दखल घेऊन भविष्यात त्या टाळण्यासाठी वातावरण बदल कृती आराखडा तयार करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याविषयी सूचना पाठवण्याचे आवाहन तज्ज्ञांना करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मुंबई फर्स्ट’नेही काही सूचना पालिकेला दिल्या आहेत.