शैक्षणिक वापरासाठी पालिकेकडून नाममात्र दरात उपलब्ध झालेल्या भूखंडावर शाळा व महाविद्यालय उभारताना स्वतच्या वास्तव्याची सोय करून घेण्याची करामत मुंबईचे माजी महापौर व राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. या पाच मजली इमारतीचा तळमजला व पहिला मजला आलिशान हॉलसाठी आंदण देण्यात आला असून शाळा व महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला कॅम्पस खुलेआमपणे पार्किंकसाठी वापरला जात आहे.
चेंबूर रेल्वेस्थानकाशेजारी मोक्याच्या ठिकाणी असलेला पालिकेचा भूखंड हंडोरे यांना शैक्षणिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला. या भूखंडावर हंडोरे यांनी नालंदा एज्युकेशन फौंडेशनच्या अंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज’साठी इमारत उभारली. मात्र इमारतीच्या दर्शनी भागात महाविद्यालयाचा फक्त फलकच आहे. प्रत्यक्षात मागच्या बाजूला शाळा व महाविद्यालय उभारण्यात आले आहे. या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा दर्शनी भागात शाळा वा महाविद्यालयाऐवजी आलिशान नालंदा हॉल आढळतो. या समोरील भूखंड लग्नात येणाऱ्यांच्या पार्किंगसाठी आरक्षित ठेवल्याचा फलकच तेथे लावण्यात आला आहे. याशिवाय तळमजल्यावरील आवारही शेड टाकून बंदिस्त करण्यात आले आहे. ते संबंधित कॅटर्सतर्फे वापरले जात आहे. अधिक चौकशी केली असता लग्नासाठी वा इतर कार्यक्रमांसाठी हे दोन्ही हॉल दिले जातात, असेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना वावरण्यासाठी स्वतंत्र आवारच नसल्याचे दिसून आले.