दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागला असतानाच मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंडमधील सामूहिक बलात्कारप्रकरणी येत्या दहा दिवसांत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासही पूर्ण झाला आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. आरोपपत्र दाखल करण्याकरिता मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सारी तयारी पूर्ण केली आहे. काही प्रमाणपत्रे मिळण्यास तीन-चार दिवसांचा कालावधी लागेल. १० दिवसांमध्ये आरोपपत्र सादर केले जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. आणखी काही महिलांनी शक्ती मिल कपाऊंडमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारींचा तपास करण्यात येत आहे.