मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मुदत उलटूनही दिलासा नाहीच

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई गोवा महामार्गावरील ११ महत्त्वाच्या टप्प्यांतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी २५ ऑगस्ट ही मुदत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केली होती. मात्र, ही मुदत हुकल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या गणेशभक्तांना प्रचंड मनस्ताप झाला. आता त्यांचा परतीचा प्रवासही खडतर असून, या मार्गावरील खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघरमधून मोठय़ा प्रमाणात गणेशभक्त एसटी, खासगी वाहनांमधून कोकणात गेले. यंदा तरी या महामार्गावरून  खड्डेमुक्त प्रवास  होईल, अशी आशा वाहन चालकांना व गणेशभक्तांना होती. मात्र, मुसळधार  पाऊस व महामार्गावर मोठय़ा प्रमाणात असलेले खड्डे यामुळे रत्नागिरी आणि त्यापुढीलही प्रवासासाठी अतिरिक्त चार ते पाच तास लागत होते.

मुंबई – गोवा महामार्गावर ११ महत्त्वाच्या टप्पे खड्डेमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली होती.

ही मुदत हुकली आणि खड्डय़ातूनच कोकणापर्यंत वाहन चालकांना प्रवास करावा लागला. पळस्पे ते इंदापूर हा ८२ किलोमीटर पट्टा, खेड, चिपळूण ते हातखंबा हा  भाग आणि आरवलीपर्यंतच्या रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे  खडतर प्रवासाबरोबरच वाहतूक  कोंडीचे विघ्न उभे राहिले.

यासंदर्भात विचारले असता, पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान (ठाणे परिक्षेत्र-वाहतूक) यांनी मुंबई-गोवा महामार्गावर अद्यापही मोठय़ा प्रमाणात खड्डे असल्याचे नमूद केले. महामार्गावरील रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाने २५ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवले जातील, असे स्पष्ट केले होते. परंतु कोकणात मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा तयार झाले. पुन्हा खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्राधिकरणाने दिल्याचे प्रधान म्हणाले.

* मुंबई – गोवा मार्गावरील इंदापूर ते पोलादपूपर्यंत ६० ते ७० ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांमुळे रेती, खडी रस्त्यावर पसरली आहे. परिणामी या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरत आहे.