१०७ नवीन रुग्ण ; तीन मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या थेट निम्म्याने कमी झाली असून मृत्यूचा आकडाही ११ वरून थेट ३ आला आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना काही दिवसांमध्ये लक्षणे दिसून आल्यावर पुन्हा ही संख्या वाढू शकते.

मुंबईत गेल्या आठवडय़ात दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली होती. मृतांचे प्रमाणही वीसपर्यत गेले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे संसर्ग प्रसार कमी झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या रुग्णांच्या चाचण्या प्राधान्याने केल्या गेल्या. यामुळे रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली होती. आता थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती अलग केल्याने प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु अजूनही या भागांमध्ये बाधा झालेले रुग्ण असण्याची शक्यता असून पाचव्या दिवसापासून लक्षणे दिसण्यास सुरूवात होईल. तेव्हा पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा संसर्ग प्रसार कमी झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दरम्यान गुरूवारी मुंबईत करोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांचा आकडा २०४३ झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात ३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११६ वर गेला आहे. दिवसभरात २१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर आणखी २९९ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

वरळीतील रुग्णांची संख्या तब्बल ३९० वर गेली आहे. त्यापाठोपाठ भायखळा, नागपाडा परिसरातील रुग्णांचा आकडा १६२ वर गेला आहे. तब्बल ८ विभागात १०० च्या वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. धारावीत मोठय़ा प्रमाणात रुग्णांची तपासणी सुरू असून दिवसभरात २६ नवीन रुग्ण सापडले आहेत.

धारावीत २६ नवीन रुग्ण

अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावी भागात गुरुवारी नवीन २६ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांचा एकूण आकडा ८६ वर गेला आहे. आतापर्यंत या भागात ९ जणांचा बळी गेला आहे.

परिचारिकेला करोना

नवी मुंबईत आज २ नव्या करोना रुग्णाची भर पडली  नवी मुंबईतील करोनाचे शहरात एकूण ५४ रुग्ण झाले आहेत. बेलापूर येथील अपोलो रुग्णालयातील  परिचरिकेला करोना झाला  असून करावे गावातील व मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयातील कक्षसेवक असलेल्या कर्मचारम्य़ाला करोना झाला आहे.त्यामुळे अपोलो रुग्णालय व करोना येथील संपर्कातील सर्वांचे अलगिकरण करण्यात आले आहे.

पत्रकारांचीही तपासणी

अत्यावश्यक सेवा म्हणून रोज बातम्यांसाठी फिरणाऱ्या पत्रकारांमध्येही करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने पत्रकारांचीही तपासणी करण्यासाठी एक खास शिबीर आज आझाद मैदान परिसरात आयोजित केले होते. छायाचित्रकार, पत्रकार, कॅमेरामन या शिबिरात सहभागी झाले होते. त्यात ८७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.

माहिममध्ये पोलिसाला लागण

खार पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका ३१ वर्षीय पोलिसाला करोना झाला असून तो माहीम परिसरात राहतो. त्यामुळे माहीम मधील  रुग्णांची संख्या १० झाली आहे.

* वरळी प्रभादेवी – ३९०

* भायखळा, नागपाडा – १६२

* ग्रांटरोड, नानाचौक – १३५

* दादर, माहीम, धारावी – १२३

* अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी पश्चिम – १०६

* बांद्रा, सांताक्रूझ, खार पूर्व -१०५

* देवनार, गोवंडी – १०३

* अंधेरी पूर्व – १०१