वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका (सुओमोटो) दाखल करून घेतली होती. या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा कायद्यानुसार निष्काळजीपणाच्या प्रकरणांतील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकण्यासाठी समिती स्थापन करणे हे बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप ती स्थापन केलेली नाही, ही बाब संबंधित रुग्णाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत तात्काळ ती स्थापन करण्यासाठी पावले उचलण्याचे बजावत त्यासाठी न्यायालयाने सरकारला ३१ मार्चची मुदतही घालूनही दिली.