News Flash

मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ

एका डोससाठी घेतले १२६० रुपये... लसीसाठी सोसायटीने जवळपास पाच लाख रुपये दिल्याची माहिती... लसीकरण शिबीरं घेत नसल्याची संबंधित रुग्णालयांची माहिती

एका डोससाठी घेतले १२६० रुपये... लसीसाठी सोसायटीने जवळपास पाच लाख रुपये दिल्याची माहिती... लसीकरण शिबीरं घेत नसल्याची संबंधित रुग्णालयांची माहिती. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्याला बोगस लस दिली गेली असल्याचा आरोप करत बोगस पद्धतीने लसीकरण सुरू असल्याचा दावा मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. या आरोपानं खळबळ उडाली असून, लसीकरण शिबीर आयोजित करून सोसायटीतील ३९० जणांना लस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही, त्याचबरोबर ज्या रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या घटनेनं लस घेतलेले नागरिक हादरले आहेत. या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ‘इंडिया टुडे’ने नागरिकांच्या आरोपाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. सोसायटीच्या आवारातच झालेल्या या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. राजेश पांडे असं शिबिराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, त्याने स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा- ‘कोविन’सक्ती रद्द; १८ वर्षांवरील सर्वाना थेट केंद्रावर लसलाभ

याच शिबिरात लस घेतलेले हितेश पटेल म्हणाले, माझ्या मुलाने लस घेतली. एका डोससाठी १२६० रुपये दिले. पण, लस घेतल्यानंतर आम्हाला कोणताही मेसेज आला नाही. इतकंच नाही, तर आम्हाला लस घेताना फोटो सुद्धा काढू दिले नाही,” असं त्यांनी सांगितलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले. सोसायटीने जवळपास पाच लाख रुपये दिले असल्याचं माहिती संबंधित सदस्यांनी दिली.

Corona Update : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, दिवसभरात ३८८ मृत्यूंची नोंद!

“लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं आम्हाला दिसली नाही किंवा दुष्परिणामही (साईड इफेक्टस्) दिसून आले नाहीत. त्यामुळे आम्हाला धक्काच बसला. इतकंच काय तर आम्हाला प्रमाणपत्रही दिली गेली नाही, त्यामुळे आम्ही शोधशोध घेण्यास सुरूवात केली. १०-१५ दिवसानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिली गेली,” असं सोसायटीतील रहिवाशी असलेले ऋषभ कामदार यांनी सांगितलं. लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचं रुग्णालयांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित रुग्णालयातील अधिकारी आणि सोसायटीतील नागरिक यांची चौकशी केली जाईल. जर यात काही गैरकारभार झाला असेल, तर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

प्रमाणपत्रावर रुग्णालयांकडून खुलासा

लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्र इत्यादी. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका आणखी बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं.

यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध केलं. ज्यात म्हटलं आहे की, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने कांदिवलीतील हाऊस सोसायटीतील नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र दिली गेली असल्याचं अलिकडेच निदर्शनास आलं आहे. नागरी सोसायट्यांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण शिबीर आयोजित करत नाही, हे स्पष्ट करत असून, या प्रकरणी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि तक्रारही नोंदवत आहोत,” असं नानावटी रुग्णालयाने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 8:05 am

Web Title: mumbai latest updates mumbai housing society vaccination scam fake covid shots bmh 90
टॅग : Coronavirus,Mumbai News
Next Stories
1 म्युकरबाधित मृतांच्या संख्येत महिनाभरात ८३ टक्के वाढ
2 मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा
3 प्रत्येक शहरांत संक्रमण शिबिरे!
Just Now!
X