डहाणू अपघातानंतर अनेक मेल-एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वेवर डहाणूजवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे डबे घसरल्यानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. मालगाडीचे डबे रूळांवर पडल्याने दोन्ही मार्गावरील रूळांची हानी झाली. पश्चिम रेल्वेने युद्धपातळीवर काम करत हा बिघाड दुरुस्त केला असला, तरी जवळपास तीन दिवस पश्चिम रेल्वेच्या विविध लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या. या गाडय़ांची आरक्षणे केलेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने तिकिटाची रक्कम परत केली आहे. ही रक्कम जवळपास एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना पुढील स्थानकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बसगाडय़ांचीही सुविधा पुरवण्यात आली.

डहाणूजवळ सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडल्यावर पश्चिम रेल्वेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मालगाडीचे डबे उचलल्यानंतर या डब्यांमुळे अप आणि डाउन मार्गावरील रूळांची हानी झाली. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द झाल्या होत्या. बुधवारी संध्याकाळपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरी या मार्गावर अजूनही ताशी २० किमीची वेगमर्यादा घालण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या गाडय़ांमध्ये आरक्षण केलेल्या प्रवाशांना आपापली आरक्षणे रद्द करावी लागली. तिकीट रद्द केल्यानंतर पूर्ण शुल्क परत देत पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यापोटी एक कोटी रुपयांचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. तसेच डहाणूच्या मागे-पुढे अडकलेल्या प्रवाशांना बोरीवली, विरापर्यंत आणण्यासाठी  बसगाडय़ांची व्यवस्था करावी लागल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.