रोज रात्री ९ वाजता मुंबई हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर होत असलेल्या हवामान नोंदींमध्ये सकाळी साडेआठपर्यंतचे किमान तापमान व पुढच्या बारा तासांतील कमाल तापमान लिहिले जाते. वर्षांनुवर्षे नियमाप्रमाणे हे असेच घडते. रविवार मात्र यासाठी अपवाद ठरला. दररोजप्रमाणे या नोंदी दिल्या असत्या तर दिवसभरातील किमान तापमानापेक्षा कमाल तापमान कमी असल्याचे दिसले असते. त्यामुळे कुलाब्याच्या किमान तापमानाची जागा रिक्त ठेवण्यात आली.

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मुंबईत उद्योग-व्यवसायासाठी आलेल्या लाखो लोकांना या शहरातील अनेक वैशिष्टय़ांची भुरळ पडते. एकीकडे बाहेरचे ऊन, वारा, पावसापासून पूर्णपणे अलिप्त करणाऱ्या काँक्रिटच्या वातानुकूलित टॉवरमध्ये मिनिटामिनिटाला कोटय़वधी रुपयांच्या उलाढाली होत असतात. त्या टॉवरच्या काचांमधून दिसणारा निळाशार समुद्र हाही याच शहराचा भाग आणि जगात इतर कोणत्याही नगरात नसलेले जंगल हेदेखील या शहरातच. भौगोलिकदृष्टय़ा कोकणचा भाग असलेल्या आणि कोणे एके काळी जंगलाने वेढलेल्या मुंबईत पाऊसही प्रचंड पडतो. मुसळधार आणि संततधार ही येथील पावसाची वैशिष्टय़े. एका दिवसात तब्बल ९४४ मिलीमीटर पावसाचा विक्रमही या शहरात घडला आहे.

रविवारी या पावसामुळे आणखी एक अपवादात्मक घटना पाहायला मिळाली. हवामानाशास्त्राच्या प्रचंड पसाऱ्यात तशी अगदी क्षुल्लक म्हणावी अशी. पण सामान्यांसाठी सुरस कहाणीसारखी. तर झाले असे, की दररोज हवामान खात्याकडून त्या त्या ठिकाणच्या दिवसभरातल्या किमान व कमाल तापमानाची नोंद जाहीर केली जाते. तापमानाची नोंद घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत व त्यात अगदी मिनिटामिनिटाला हवेचा ताप मोजला जातो. दिवसभरात सर्वात कमी झालेले तापमान (किमान) व सर्वात वाढलेले तापमान (कमाल) नोंदले जाते. या नोंदी २४ तासांच्या असल्या तरी प्रत्यक्षात सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ आणि रात्री साडेआठ ते सकाळी साडेआठ अशा बारा तासांच्या दोन टप्प्यात स्वतंत्र नोंदी केल्या जातात.

दिवसाच्या विशिष्ट टप्प्यात किमान व कमाल तापमान गाठले जाते. म्हणजे साधारण साडेबारा एक वाजण्याच्या सुमारास सूर्य डोक्यावर असतो व थेट येत असलेल्या किरणांमुळे हवा आणि जमीनही तापू लागते. जमिनीकडून ही उष्णता हवेत फेकली जाते. त्यामुळे जमिनीलगतची हवा अधिक तापते. सूर्य पश्चिमेकडे थोडा झुकून किरणे तिरपी येईपर्यंत हवेतील उष्णता व जमिनीतून परावर्तित झालेली उष्णता यांची बेरीज जास्त होते. त्यामुळे साधारण अडीच-तीन वाजण्याच्या सुमारास दिवसाचे सर्वाधिक तापमान नोंदले जाते. कधी कधी दुपारी दीड वाजता किंवा साडेतीन- चार वाजताही कमाल तापमानाची नोंद होऊ  शकते. यासाठी समुद्रावरून येणारा वारा, ढगांचे आवरण असे घटक कारणीभूत ठरतात. सूर्य मावळल्यानंतरही जमिनीतून उष्णता बाहेर टाकण्याचे काम सुरूच राहते. वातावरणात ढग असतील तर ते ही उष्णता धरून ठेवतात व पुन्हा हवेत परावर्तित करतात. हे चR  संपूर्ण रात्रभर चालत राहते व त्यातून होत असलेल्या ऊर्जेच्या ऱ्हासामुळे जमिनीलगतची हवा अधिकाधिक थंड होते. ही प्रक्रिया सूर्याच्या पहिल्या किरणांनी हवा पुन्हा तापू लागेपर्यंत राहत असल्याने सूर्योदयाच्या काही काळ आधी दिवसातील सर्वात कमी म्हणजे किमान तापमानाची नोंद होते. हिवाळ्यात ढगांचे आवरण नसले आणि थंड वाऱ्यांचा वेग अधिक असला की जमीन लवकर थंड पडते. त्या वेळी किमान तापमानाची वेळ थोडी पुढे-मागे होते.

यावरून साधारण एक गोष्ट लक्षात येते की रात्री साडेआठ ते सकाळी साडेआठ या वेळेत नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान हे त्या दिवसभराच्या २४ तासांतले सर्वात कमी तापमान असते तर दिवसभराचे कमाल तापमान सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठ या वेळेत नोंदले जाते. रोज रात्री ९ वाजता मुंबई हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर होत असलेल्या हवामान नोंदींमध्ये सकाळी साडेआठपर्यंतचे किमान तापमान व पुढच्या बारा तासांतील कमाल तापमान असते. वर्षांनुवर्षे हे असेच घडत आले आहे. रविवार मात्र यासाठी अपवाद ठरला.

शनिवारी मध्यरात्रीपासून पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रात्रीचे तापमान आदल्या दिवसापेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी झाले. कुलाब्यात मात्र पावसाचा पत्ताच नव्हता. केवळ एखादी सर आली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रात्रीच्या तापमानात फारसा फरक पडला नाही. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या नोंदीत किमान तापमान २७.६ अंश से. राहिले. इथपर्यंत हवामानाच्या नोंदीसाठी सर्व आलबेल होते. त्यानंतर कुलाबा परिसरातही जोरदार पाऊस सुरू झाला. अगडबंब काळ्याकुट्ट ढगांमधून सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचण्याची शक्यताच नव्हती. हवेतील उष्णता पावसाच्या सरींमुळे आणखी कमी झाली. त्यामुळे दिवसाचे तापमान वाढण्याऐवजी आणखी कमी होत गेले. परिणामी रात्री साडेआठपर्यंतच्या नोंदी आल्या तेव्हा त्या बारा तासांतले सर्वाधिक तापमान अवघे २६ अंश से. होते. म्हणजेच सकाळपर्यंतच्या बारा तासांतील किमान तापमानापेक्षाही कमी.. दररोजप्रमाणे रात्री नऊ वाजता या नोंदी दिल्या असत्या तर दिवसभरातील किमान तापमानापेक्षा कमाल तापमान कमी असल्याचे दिसले असते. त्यामुळे कुलाब्याच्या किमान तापमानाची जागा रिक्त ठेवण्यात आली.

ही घटना अपवादात्मक असली तरी अतिदुर्मीळ नाही. मुंबईसारख्या मुसळधार पावसाच्या प्रदेशात सकाळनंतर पावसाने झोडपण्यास सुरुवात केली की काही वेळा दुपारचे तापमान सकाळपेक्षा कमी होते, असे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. मुंबई हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या होसाळीकर यांनी थंड हवेच्या ठिकाणी होत असलेल्या तापमानातील चढउतारांचे वैशिष्टय़ही सांगितले. मुंबईतील तापमान हे सहसा वेगाने वर-खाली होत नाही. मात्र थंड हवेच्या ठिकाणी तापमानातील टोकाचे चढउतार सामान्य असतात. कधीतरी वाऱ्यांची दिशा व वेळा बदलल्या की दुपारी हिलस्टेशनचे वातावरण थंड होऊ  लागते. तेव्हाही सकाळी किमान व दुपारी कमाल ही घडी विस्कटते. त्यामुळे काही ठिकाणी दोनदा कमाल तापमान नोंदवण्याची पद्धत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तांत्रिकदृष्टय़ा किमान व कमाल तापमानाचा कुलाब्यातील हा घोळ हवामानशास्त्राच्या एकूण आवाक्यातील एक छोटीशी घटना आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षांच्या अनुभवावरून व नोंदींवरून मांडण्यात आलेले किमान व कमाल तापमानाच्या वेळेचे गणित बिघडणार नाही. मात्र या नियमाचे अपवाद हे अधिक लक्षात राहतात हेदेखील तेवढेच खरे..

prajakta.kasale@expressindia.com