मोबाईल चोरीचे प्रमाण पुण्या-मुंबईसारख्या शहरात मागच्या काही दिवसांत वाढले आहे. नुकतीच मुंबईत मोबाईल चोरी करणारी एका टोळीला अटक करण्यात आले आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे चोरटे रस्त्याने चालणाऱ्या महिलांचे मोबाईल खेचून पोबारा करायचे. त्यांना अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे.

श्रुतीका सिताराम(२७) या मांटुगा रेल्वे स्थानकावरून श्रध्दानंद नगर मार्गावरून घरी सायनच्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर बसून त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने महिलेच्या हातातील मोबाईल खेचला आणि धूम ठोकली. महिलेने त्वरित माटुंगा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले. मांटुगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे, हवालदार सुर्वे, पोलीस शिपाई राकेश कदम, संदिप शिंदे, राहुल चतुर, रविंद्र सोनावणे व महिला शिपाई पूनम गंभीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तांत्रिकदृष्ट्या तपास करत सीसीटीव्हीच्या आधारावर माटुंग्यातील फाईव्ह गार्डन येथे आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद असिफ अन्सार खान (१९) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (२०) या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.