प्रवासी भाडय़ातील वाढीतून मुंबईच्या उपनगरी प्रवाशांना वगळावे, या मागणीसाठी मुंबईतील खासदार रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना निवेदन सादर करणार आहेत, असे खासदार संजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. प्रवाशांना भाडेवाढीचा फारसा त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय निरूपम यांनी स्पष्ट केले.
रेल्वेच्या गोंधळाचा व गर्दीचा त्रास नियमित भोगावा लागत असताना दरवाढीचा भारही मुंबईकर प्रवाशांवर कायम टाकला जात असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्याचा फटका बसू नये, यासाठी खासदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन देण्याबाबत आपली काही खासदारांशी चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजय दीना पाटील यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने गेली अनेक वर्षे प्रवासी भाडय़ात वाढ केलेली नाही. पण सर्वसामान्यांना परवडेल, अशा पध्दतीने ती व्हावी आणि मुंबईकर उपनगरी प्रवाशांना दिलासा कसा देता येईल, यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती निरूपम यांनी  दिली.