पालिकेने मुंबईमध्ये खड्डेमुक्त चौकांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंदावणाऱ्या वाहतुकीला गती देण्यासाठी आणि छोटय़ा-मोठय़ा खड्डय़ांमुळे होणारे पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने मुंबईमधील तब्बल १२२ चौकांच्या (जंक्शन) दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तब्बल १९९.४० कोटी रुपये खर्च करून या चौकांचे डांबरीकरण करण्यात येणार आहेत. यापैकी शहर आणि पूर्व उपनगरांतील चौकांच्या कामासाठी निविदाही मागविण्यात आल्या असून लवकरच चौकांच्या दुरुस्तीच्या कामांचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. त्यानंतर मुंबईमधील नदी-नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उदंचन केंद्रांची उभारणी, त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारण्याची कामे हाती घेण्यात आली. मुंबईत अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले. मात्र उपयोगिता कंपन्यांकडून रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर पर्जन्य जलवाहिन्यांचे नुकसान झाले. मात्र त्याकडे संबंधित कंपन्या आणि पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने चौक-रस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतच आहेत.
मधल्या काळात मुंबईत पेव्हरब्लॉकचे पेव फुटले होते. पदपथांबरोबरच काही ठिकाणी रस्ते आणि चौकांमध्ये पेव्हरब्लॉक बसविण्यात आले. अनेक ठिकाणच्या चौकांमध्ये पेव्हरब्लॉक उखडले गेल्यामुळे खड्डे पडले असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांनाही या खड्डय़ांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे चौक खड्डेमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शहरामधील क्रॉफर्ड मार्केट जंक्शन, सिद्धिविनायक जंक्शन, चर्चगेट, नाना चौक यांसह ५२ मोठय़ा चौकांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरांमधील देवनार, चेंबूर, भांडुप, मुलुंड यासह २५ मोठय़ा चौकांच्या दुरुस्तीसाठी २६.४ कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात येणार असून शहर आणि पूर्व उपनगरांतील एकूण ७७ चौकांसाठी १४४.४० कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पालिकेने दुरुस्तीसाठी पश्चिम उपनगरांमधील ४५ चौकांची निवड केली असून त्यांच्या डांबरीकरणावर एकूण ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. येत्या दोन-तीन आठवडय़ांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.