पूर्व उपनगरांत महिनाभरात ‘मॅनहोल’मध्ये पडून दोघांचा मृत्यू;  रहिवाशांच्या तक्रारींनंतरही पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

प्रतिनिधी : पावसाळ्याकरिता आपली सर्व यंत्रणा तयार असल्याचे उच्च न्यायालयात छातीठोकपणे सांगणारी मुंबई महापालिका पूर्व उपनगरात मात्र अनेक गटारांवर (मॅनहोल) झाकणे बसविण्यास विसरली आहे. गेल्या महिन्याभरात पूर्व उपनगरात उघडय़ा गटारद्वारांतून पडून दोघांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही पालिकेने या गटारांना झाकणे न बसवल्याने या रस्त्यांवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी मृत्यूची दारे वाट पाहात आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. पालिकेकडून मुंबईकरांच्या सोयीसुविधांवर दरवर्षी हजारो कोटींचा खर्चदेखील करण्यात येतो. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणेवरही पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र या गटारांचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसत आहे. कंत्राटदारांकडून गटारांवर लावण्यात येणारी झाकणे सध्या निकृष्ट दर्जाची वापरली जात असल्याने दोन ते तीन महिन्यांतच ही झाकणे तुटून जातात. परिणामी गटारांमध्ये पडून होणाऱ्या अपघातांची संख्यादेखील वाढते आहे.

ट्रॉम्बे परिसरातील चिता कॅम्प येथे ७ जूनला अदीन तांबोळी या तीनवर्षीय मुलाचा अशाच प्रकारे उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनी येथे दिनेश जाटोपलिया (वय २३) या तरुणाचा २३ जूनच्या रात्री उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाला. पूर्व उपनगरात अशा प्रकारे गटारात पडून रहिवाशांचा मृत्यू होत असताना पालिकेला या विषयाचे गांभीर्य अद्याप समजले नसावे अशी परिस्थिती या परिसरात फिरल्यावर पाहायला मिळते. पालिकेच्या एम पूर्व भागात मोठय़ा संख्येने उघडी गटारे पाहावयास मिळतात. या प्रभागातील ९० टक्के भाग हा झोपडपट्टीचा आहे. येथील गौतम नगर, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर, साठे नगर, शिवाजी नगर, बैंगणवाडी तसेच घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरदेखील अनेक ठिकाणी पदपथावरील गटारांची झाकणे गायब आहेत.

चेंबूरमधील सिंधी सोसायटी, सुमन नगर, कलेक्टर कॉलनी, वाशी नाका, माहुल या परिसरांतदेखील अनेक गटारे उघडी आहेत, तर घाटकोपरमधील चिराग नगर, पेस्तम सागर, छेडा नगर, कामराज नगर, पंतनगर तसेच मुलुंडमधील बीआर नगर आणि एलबीएस रोडवरदेखील अनेक ठिकाणी गटारांची झाकणे गायब आहेत.

सध्या बसवण्यात येणारी झाकणे फायबरची आहेत. मात्र ही झाकणेदेखील भंगार विक्रेते विकत घेऊन त्याची पुन्हा विक्री करत आहेत. नवीन झाकणांचा संच कंत्राटदारांना चार ते पाच हजारांना मिळतो. मात्र भंगार विक्रेत्याकडून हीच झाकणे चारशे ते पाचशे रुपयांत विकत घेऊन हीच जुनी झाकणे कंत्राटदार पुन्हा लावत असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

पैसे वाचवण्यासाठी निकृष्ट झाकणे

पूर्वी सर्वच गटारांवर लोखंडी झाकणे बसवली जात होती. मात्र या झाकणांची चोरी होत असल्याने पालिकेने या ठिकाणी सिमेंटची झाकणे बसवली. मात्र या झाकणांमध्येदेखील लोखंडी सळया असल्याने गर्दुल्ले ही झाकणेदेखील चोरू लागले. त्यामुळे काही वर्षांपासून पालिकेने गटारावरील झाकणे फायबरची लावण्यास सुरुवात केली आहेत. मात्र ती तकलादू असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी या झाकणांना भेगा पडल्याचे दिसून येते. दोन ते तीन महिन्यांतच ही झाकणे तुटून जातात. परिणामी दुसरे कंत्राट निघेपर्यंत गटारे उघडीच राहत असल्याने अपघातांची संख्या वाढते आहे.

‘पैसे वाटावे लागतात’

एका पालिका कंत्राटदाराशी संपर्क साधला असता त्याने याचे काम लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांवर फोडले. ‘गटारांची कामे करतानाच पालिका अधिकारी, आमदार, नगरसेवक, विविध पक्षांचे नेते यांना पाकिटे द्यावी लागतात. उरलेल्या पैशांत काम करावे लागते. त्यामुळे मग साहित्याशी तडजोड करावी लागते,’ असे या कंत्राटदाराने सांगितले.