मुंबईकरांशी संवाद साधता यावा, त्यांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करता यावी, यासाठी मुंबई महापालिकेने फेसबुकशी नाते जोडले आहे. महापालिकेच्या विविध नागरी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी फेसबुकचा उपयोग होईल, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत नाही, अशी ओरड नागरीक नेहमीच करीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी सध्या तरुणाई आणि एकंदरीत सर्वाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्कीग साईटचा आधार घेण्याचे पालिकेने ठरविले आह़े  नागरीक फेसबुकच्या माध्यमातून सहजरित्या पालिकेशी संवाद साधू शकणार आहेत. पालिकेने शुक्रवारी फेसबुकवर  bmc, mumbai : Public Interaction  या नावाने सेवा कार्यान्वित केली. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते फेसबुकवरील या नव्या सेवेस सुरुवात करण्यात आली. मुंबईकरांनी फेसबुकवरून महापालिकेशी संवाद साधावा, असे आवाहन सीताराम कुंटे यांनी केले आहे.