18 January 2021

News Flash

मालमत्ता कर भरावाच लागणार

पाचशे चौरस फुटांखालील सदनिकाधारकांची निराशा

(संग्रहित छायाचित्र)

पाचशे चौरस फुटांखालील सदनिकाधारकांची निराशा;  शिवसेनेला करमाफीचा विसर; थकबाकीसह कर भरण्याचे आव्हान

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाकाळात डळमळलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटांखालील सदनिधारकांकडून सर्वसाधारण कर वगळून उर्वरित कराच्या वसुलीची तयारी सुरू केली आहे. येत्या आठवडय़ाभरात लहान घरात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईकरांना दोन वर्षांचा मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. निवडणुकीच्या काळात शिवसेनेने दिलेल्या आश्वासनानुसार मालमत्ता कर भरावा लागणार नाही, ही मुंबईकरांची आशा धुळीस मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा लहान घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याची, तसेच ७०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर पालिकेची सत्ता हाती आलेल्या शिवसेनेला करमाफी कशी करावी हेच उमजत नव्हते. अखेर या संदर्भातील ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर करत राज्य सरकारकडे पाठविली होती. त्या वेळी राज्यात भाजपचे सरकार होते. शिवसेनाही त्याचाच एक भाग होते. मात्र उभय पक्षांमधील धुसफुस करमाफीमधील मोठा अडथळा बनली होती. परिणामी, या घोषणेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होऊ  शकली नाही. अखेर पालिकेने मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण कर वगळून उर्वरित कर वसूल करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावरून गदारोळ झाल्यामुळे ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांकडून करवसुली करणे थांबविण्यात आले.

दहापैकी नऊ कर थकबाकीसह भरावे लागणार

मालमत्ता कराच्या देयकात सर्वसाधारण कर, जल कर, जललाभ कर, मलनि:सारण कर, मलनि:सारण लाभ कर, पालिका शिक्षण उपकर, राज्य शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष उपकर, पथकर या दहा करांचा समावेश असतो. यापैकी केवळ सर्वसाधारण कर माफ करून उर्वरित नऊ  कर लहान घरात राहणाऱ्या मुंबईकरांना भरावेच लागणार आहेत. इतकेच नव्हे तर मागील वर्षांची थकबाकीही वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

५ कोटी २० लाख महसूल अपेक्षित

शिवसेनेच्या घोषणेनुसार मुंबईतील ५० चौरस फुटांपर्यंतच्या एक लाख ८० हजार सदनिकाधारकांना करमाफी मिळणार होती; परंतु आता त्यांना नऊ  कर भरावेच लागणार आहेत. या सदनिकाधारकांकडून प्रतिवर्षी सुमारे दोन कोटी ६० लाख रुपये कर पालिकेला मिळणार आहे. मागील वर्षीची थकबाकी मिळून सुमारे पाच कोटी २० लाख रुपये महसूल पालिकेला अपेक्षित आहे.

लवकरच देयके वितरण

या सदनिकाधारकांची देयके एक-दोन दिवसांत पालिकेला उपलब्ध होणार आहेत. युद्धपातळीवर त्यांचे वितरण करून करवसुलीला सुरुवात करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत महसुलाचा मोठा हिस्सा पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे उद्दिष्ट करनिर्धारण आणि संकलन विभागाला देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:10 am

Web Title: mumbai municipal corporation to take property tax from flat owners below 500 square feet zws 70
Next Stories
1 पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती
2 नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू?
3 करोना संसर्गाच्या भीतीने लाडू खरेदीकडे पाठ
Just Now!
X