मालाड, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, माझगाव वायुप्रदूषणात सर्वाधिक धोकादायक
दिल्लीतील प्रदूषण कमी होत असतानाच मुंबईने मात्र प्रदूषणात दिल्लीला मागे टाकल्याचे दिसत आहे. डिसेंबरपासून काही दिवसांचा अपवाद वगळता मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षित पातळीपेक्षा तिपटीने अधिक आहे. मालाड, अंधेरी, वांद्रे कुर्ला संकुल, चेंबूर तसेच माझगावमध्ये प्रदूषण पातळी सर्वाधिक आहे.
समुद्रकिनारी असल्याने मुंबईला वेगवान वाऱ्यांची साथ मिळते व हवा स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबईत तुलनेने प्रदूषण कमी होते. त्यानंतर हिवाळ्यात वारे पडल्याने प्रदूषण वाढू लागले. त्याउलट जानेवारीत दिल्लीत वाहनांचा सम-विषम नियम लागू झाल्याने प्रदूषणात थोडी घट झाली. मुंबईत मात्र देवनार कचराभूमीतील आगीने प्रदूषणात अधिक भरच घातली.
त्यातच प्रदूषण नियमनाचे कोणतेही नियम करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवडय़ातील एका दिवसाचा अपवाद वगळता या महिन्यात मुंबईतील हवा खराब राहिली आहे.
१० मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे धूलिकण प्रदूषण वाढवत आहेत.
गुरुवारीही मुंबईच्या मालाड, अंधेरी, माझगाव परिसरात तसेच नवी मुंबईतही प्रदूषणाची पातळी ३०० हून अधिक झाली होती. ही पातळी १०० हून खाली असणे अपेक्षित आहे.

प्रदूषण पातळी..
मालाड – ३११
अंधेरी – ३१२
माझगाव – ३२२
नवी मुंबई – ३३४