रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. आयुक्तांना भेटण्याची मागणी करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यात २० कार्यकर्ते जखमी झाले. खड्डय़ांच्या समस्यांबाबत सोमवारी दुपारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आझाद मैदानात जमा झाले. त्यांचा मोर्चा महापालिका मुख्यालयासमोर आल्यावर सुरक्षा अधिकारी सतर्क झाले. मुख्यालयाच्या दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना थोपवण्यासाठी पालिकेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात सुमारे वीस कार्यकर्ते जखमी झाले, त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

५० लाखांचे लाच प्रकरण : पोलीस निरीक्षक  नेर्लेकर यांना अटक
मुंबई : ५० लाखांची लाच उकळणारे खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. एका व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन नेर्लेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सामंत यांनी ५० लाच रुपयांची लाच मागितली होती. सापळा लावून त्यांना अटक करत असताना ते पळून गेले होते. नेर्लेकर आणि सामंत तेव्हापासून फरार होते. या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. सोमवारी पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या कार्यालयात शरण गेले. पोलिसांना त्यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

सराफाच्या कारखान्यातून ९० लाखांच्या दागिन्यांची लूट
मुंबई : काळाचौकी येथे दागिने बनविण्याच्या कारखान्यातून ९० लाख रुपये मूल्याचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले. बनावट चावीने दार उघडून ही लूट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अरविंद नाईक यांचा काळाचौकी येथील फेरबंदर परिसरात हिरजी भोजराज चाळीत दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. रविवारी सकाळी नाईक यांना कारखान्यातील ४ किलो सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. पण कारख्यान्याचे दार तोडल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. बनावट चावीने  दार उघडून पोटमाळ्यावरील कपाटातील दागिने चोरण्यात आले होते. कुण्या माहितगारानेच ही चोरीची योजना आखली असावी, असे पोलिसांनी सांगितले. कारखान्यात एकूण पाच कामगार काम करतात. त्यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू
ठाणे : लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या पंकज कदम (१८) या तरुणाचा सोमवारी दुपारी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. कोपरी पुलाजवळ अडीचच्या सुमारास पंकज जखमी अवस्थेत सापडला. त्याला ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पंकज ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असल्याची ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली.

खारमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्या
मुंबई : खार येथील ज्येष्ठ नागरिकाची त्यांच्याच गोदामात अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. महेशचंद्र बाफना (६९) असे त्यांचे नाव असून सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बाफना यांच्या कुटुंबीयांनी सकाळीगोदाम उघडले असता बाफना यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर मोठी जखम होती. तसेच त्यांचा मोबाइलही चोरीला गेला होता. गोदाम असलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक नाही. तसेच सीसीटीव्ही पण नाही. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा संशय आहे.