ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल यामुळे मुंबईत पार्ट्या, एकत्र भेटणं, नाईट क्लबमध्ये जाणं या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे या सगळ्या पब, नाईट क्लब्सवर मुंबई महापालिका प्रशासनाची करडी नजर आहे. असं असतानाच मुंबईतल्या एका नाईट क्लबमध्ये करोना नियमांचं उल्लंघन झाल्याने मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतल्या सांताक्रूझ भागात असलेल्या बॉम्बे अड्डा या नाइट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची बाब लक्षात आली. पार्टी करणाऱ्या २७५ व्यक्तींनी मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे या प्रकरणी बॉम्बे अड्डा या नाईट क्लबला ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

ज्या प्रमाणे बॉम्बे अड्डा या नाईट क्लबवर कारवाई झाली तशीच कारवाई दादरमधल्या प्रीतम या हॉटेलवरही करण्यात आली. प्रीतम हॉटेलवर पहाटे एकच्या सुमारास महापालिका अधिकाऱ्यांनी अचानाक भेट दिली. तेव्हा १२० जणांनी मास्क लावला नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे ज्यांनी करोनाचे नियम मोडले त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. अशीच कारवाई भगवती हॉटेलवरही करण्यात आली.

१० डिसेंबरला झालेल्या एका कारवाईत मुंबई महापालिकेने लोअर परळ येथील एका क्लबविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या क्लबमध्येही करोना प्रतिबंधाचे नियम मोडले गेले होते. मुंबईतल्या सगळ्या नाईट क्लब आणि पब्स यांना मुंबई महापालिकेने ताकीद दिली होती की क्लब उघडले असले तरीही करोना नियमांचं उल्लंघन सहन केलं जाणार नाही. ते होत असल्याने आता मुंबई महापालिका नाईट क्लब आणि पब्स यांच्याविरोधात कारवाई करते आहे. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईतील वांद्रे आणि परळ परिसरातील हॉटेलमध्ये रात्री उशिरा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तिथे सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला होता. अनेक जण मुखपट्टीविनाच होते. त्यामुळे पालिकेने मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या प्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पालिकेने मुंबईतील हॉटेल, पब, रात्री उशिरा सुरू असलेल्या क्लबवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.