News Flash

‘घर केवळ मुस्लिमांसाठीच’, ‘मांसाहार न करणाऱ्यांसाठी’, मुंबईतील घरांच्या जाहिरातींमध्येही केला जातोय भेदभाव

सोसायट्यांनी तयार केलेत स्वत:चे नियम

‘घर केवळ मुस्लिमांसाठीच’, ‘मांसाहार न करणाऱ्यांसाठी’, मुंबईतील घरांच्या जाहिरातींमध्येही केला जातोय भेदभाव
प्रातिनिधिक फोटो

करोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांकडून देण्यात येणाऱ्या सवलती, सरकारने दिलेल्या करसवलतींमुळे घर खरेदीसंदर्भात सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. घरांच्या विक्रीसंदर्भातील अनेक वेबसाईटवरुन माहिती मिळवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. असं असतानाच काही वेबसाईटवर केवळ मुस्लिमांसाठीच घर उपलब्ध असल्याच्या जाहिराती दिसत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई आणि उपनगरांमधील काही घरांच्या जाहिरातींमध्ये ही मालमत्ता केवळ मुस्लिमांनाच विकली अथवा भाड्याने दिली जाईल असं नमूद करण्यात आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका नामांकित वेबसाईटने आपल्या अल्गोरिदमच्या मदतीने ही अटक असणाऱ्या जाहिराती काढून टाकल्याचे वृत्त स्वेअरफीट इंडिया डॉट कॉमने दिलं आहे.

घर विकत घेताना किंवा विक्री करताना अनेकदा ग्राहकाचा धर्म बघितला जातो. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तर अशाप्रकारे अनेकांकडून अटी घातल्या जात असल्याचे दिसून येते. नुकत्याच एका वेबसाईटवर ‘ओन्ली मुस्लीम अलाऊड’ म्हणजेच केवळ मुस्लिमांसाठी अशी जाहिरात देण्यात आली होती. नो ब्रोकर वेबसाईटवर तर Only Muslims Allowed या टॅग अंतर्गत असणारी जाहिरात दिसून आली. हा फ्लॅट मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये आहे. यासंदर्भात ‘स्वेअरफीट इंडिया’ने नोब्रोकरशी संपर्क साधला असता, “नोब्रोकर अशाप्रकारचा कोणताही भेदभाव करत नाही. जाहिरात देणाऱ्या व्यक्तीने ही अट इमारतीचे नाव आणि पत्ता टाकतात त्या ठिकाणी दिली आहे. आम्ही ती जाहिरात काढत आहोत. तसेच पत्त्यासंदर्भात योग्य माहिती असेल याबद्दलचे अल्गोरिदम आम्ही यापुढे वापरणार आहोत,” अशी माहिती देण्यात आली. यानंतर ही जाहिरात वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आली.


मात्र याच प्रकराची जाहिरात स्वेअरयार्ड्स डॉट कॉमवरही दिसून आली. या वेबसाईटवर तर केवळ मुस्लिमांसाठीच या टॅगखाली अनेक जाहिराती दिसून आल्या. उदाहरणार्थ ही खालील जाहिरात पाली हिल्स परिसरातील प्रॉपर्टीसाठी आहे. या टू बीएचके फ्लॅटचे भाडे ७५ हजार रुपये आहे. मात्र तो केवळ मुस्लिमांनाच भाड्यावर दिला जाईल असं जाहिरातीत म्हटलं आहे. अशाच प्रकारे केवळ मुस्लीम कुटुंबासाठी माहिममध्येही भाड्याने घर उपलब्ध असल्याचे साईटवर दिसून आले. अशा एक दोन नाही अनेक जाहिराती या साईटवर आहेत. यासंदर्भात स्वेअरयार्ड्सला सविस्तर मेल पाठवण्यात आल्यानंतरही त्यावर त्यांचे काहीच उत्तर आलं नाही असंही ‘स्वेअरफीट’ने म्हटलं आहे.

अगदी मिरा रोडमध्येही अशाप्रकारे केवळ मुस्लिमांसाठीच घर उपलब्ध प्रकारातील जाहिराती या वेबसाईटवर असल्याचे दिसते. मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे एखाद्या विशिष्ट समाजातील व्यक्तींना घर विकले अथवा भाड्याने दिले जाते. याचबरोबर अनेक सोसायटींनी स्वत:चे नियम बनवले असल्याने घर भाड्याने घेताना त्रास होतो. उदाहर्णार्थ एकट्या महिलेला किंवा लग्न न झालेल्या लोकांना फ्लॅट भाड्याने देऊ नये असा नियम अनेक सोसायट्यांनी केला आहे. तर काही सोसायट्या मुस्लिमांना घर भाड्याने देण्यास हरकत घेताना दिसतात. “सर्वोच्च न्यायालयाने झोराष्ट्रीय सोसायट्यांसंदर्भातील खटल्यामध्ये ठराविक सोसायटीमध्ये केवळ झोराष्ट्रीयन कुटुंबियांना राहू देण्याचा निर्णय दिला होता,” असं याबद्दल बोलताना वकील अशणारे विनोद संपत सांगतात.

२००७ साली अभिनेता अमिर खाननेही अंधेरीमधील एका सोसायटीने आपल्याला धर्माच्या आधारावर घर विकत देण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. अशाप्रकारे धर्माच्या आधारे घरांची खरेदी विक्री किंवा भाड्यासंदर्भातील व्यवहार होणे काही नवीन नाही. २०१५ सालच्या एका वृत्तानुसार अनेक जाहिरातींमध्ये केवळ मुस्लिमांसाठी असं स्पष्टपणे लिहिल्याचं आढळून येतं.

केवळ धर्मच नाही तर खाण्याच्या सवयींनुसारही घर नाकारण्याची प्रकार घडतात. मांसाहार करणाऱ्यांना घर भाड्याने देण्यास नकार देणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे असल्याचेही दिसून येतं. अनेक प्रकरणांमध्ये धर्माबरोबच एकटी स्त्री असणं, लग्न न झालेली मुलं, खाण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींमुळे घर नाकारले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 12:50 pm

Web Title: mumbai only muslims allowed in these properties for rent and buy scsg 91
Next Stories
1 मुंबई, ठाण्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात करोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज
2 मुंबईत २६ वर्षांतला विक्रमी पाऊस; सप्टेंबर महिन्यातील विक्रम मोडला
3 आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार; कोर्टातली लढाई मला नवीन नाही – संजय राऊत
Just Now!
X