छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील कामा रुग्णालय आणि सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला जोडणाऱ्या गल्लीत चिकू नावाने ओळखली जाणारी महिला मोती विकण्याचे काम करते. अर्थात खरेखुरे दिसणाऱ्या नकली मोत्यांच्या विक्रीसाठी ही चिकू प्रसिद्ध. या महिलेकडे सनी वाघेला नावाचा एक इसम येतो आणि चित्रपटात काम करण्यासाठी एका आठ-दहा दिवसाच्या बालकाची गरज आहे. रग्गड पैसे मिळतील, असे सांगतो. इतकेच नव्हे तर कमिशन देण्याचेही आमीष दाखवतो. चिकूही विचार करू लागते. परंतु आठ-दहा दिवसाचे बालक आढळून येत नाही. आपल्या माहितीमध्ये असे मूल नसल्याचे ती सांगते. मात्र संजना नावाच्या तिच्या मैत्रिणीचे मूल तीन महिन्यांचे आहे.. ते चालू शकत असेल तर आपण संजनाशी बोलतो, असेही चिकू सनीला सांगते.

सनी तयार होतो. तीन महिन्यांचे मूलही चालेल, असे सांगतो. लगेचच त्याला घेऊन चिकू संजनाकडे येते. फॅशन स्ट्रीटवर छोटा व्यवसाय करणारी संजना आपल्या मुलाला चित्रपटात दाखविले जाईल, या कल्पनेनेच भारावून जाते. ती लगेचच नवरा आणि भावोजींना बोलावून घेते. मूल तिच्याकडे असतेच. परंतु एका अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात मूल कसे देणार या विवंचनेत ती असते. त्याचवेळी सनी आपला आणखी एक सहकारी पंकज याला गेटवे ऑफ इंडियाजवळील इरॉस चित्रपटगृहाजवळ बोलावून घेतो. तीन तासासाठी पंधरा हजार रुपये देऊ, असे सनी सांगतो. चित्रीकरण संपल्यावर १५ हजार रुपये देऊ असेही सांगतो. विश्वास बसावा म्हणून पंकजला त्यांच्याजवळ उभे करून ठेवतो आणि स्वत: निघून जातो.

काही वेळाने पंकजचा मोबाइल वाजू लागतो.. आपल्या मालकाचा फोन आहे.. ताज हॉटेलमध्ये चित्रीकरण सुरू आहे. आपल्याला मुलाला घेऊन तेथे बोलाविले आहे. लगेचच ते सर्व जण ताज महाल हॉटेलच्या बाहेर पोहोचतात. पंकज कुणाशी तरी बोलणे करतो आणि पाच मिनिटात येतो असे सांगून मुलाला घेऊन जातो. परंतु तो पुन्हा परत येतच नाही. ताज महाल हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांकडे ते चौकशी करतात. परंतु कोणीही तीन महिन्यांच्या मुलाला घेऊन हॉटेलच्या आत आलेलेच नाही, असे सांगितले जाते. ते हादरतात. लगेच आजाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेतात. मुलगा हरवल्याची तक्रार करतात. झाला प्रकार कथन करतात. चिकूला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतात. परंतु तीही सनी वाघेला नामक त्या इसमाला ओळखत नसते.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सनी आणि पंकजची छायाचित्रे मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु काहीही हाती लागत नाही. या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही समांतर तपास सुरू करण्यात येतो. सहआयुक्त संजय सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संतोष बागवे, शशांक शेळके आदींचे पथक तपास सुरू करते. इरॉस चित्रपटगृह तसेच ताज महाल हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली जाते. परंतु सनी आणि पंकजबाबत स्पष्ट छायाचित्र मिळत नाही. अखेरीस कामा रुग्णालय, फॅशन स्ट्रीट, इरॉस चित्रपटगृह आणि ताज महाल हॉटेल परिसरातील मोबाइल टॉवरचा त्या काळातील तपशील मागविला जातो. ही घटना घडली त्या काळातील तब्बल दीड लाख कॉल्सचा तपशील पोलिसांना मिळतो. या प्रत्येक क्रमांकाची तपासणी केली गेली, तेव्हा या चारही ठिकाणी दोन मोबाइल क्रमांक सामाईक असल्याचे आढळून आले. या मोबाइल क्रमांकावर सुदैवाने व्हॉट्स अप उपलब्ध होते आणि या व्हॉट्स अपच्या डीपीवर छायाचित्रही होते. ही छायाचित्रे संजनाला दाखविण्यात आली. त्यापैकी एक सनी वाघेलाचे होते. संजनाने ते लगेच ओळखले. या क्रमांकावरून पत्ता मिळविण्यात आला. सनीला अटक केल्यानंतर पंकजची माहिती मिळण्यास वेळ लागला नाही. दोघांच्या अटकेनंतरही मुलगा मात्र मिळाला नाही. आशा दोहाडे नामक महिलेला ४० हजार रुपयांत मुलाची विक्री करण्यात आली होती, असे या दोघांनी सांगितले. कामा रुग्णालयात सफाई कामगार असलेली आशा कुलाबा येथील नेव्हीनगरात राहते. रुग्णालयातून तिचा पत्ता मिळवून गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घरी पोहोचले तेव्हा ती त्याच तीन महिन्यांच्या मुलासोबत बसलेली होती. मुलगा ताब्यात घेऊन पोलिसांनी आशाला अटक केली. या प्रकाराने तिचा पतीही चक्रावला. हा आमचा मुलगा आहे, असे तो सांगू लागला. माझी बायको गर्भवती होती आणि तिने तीन महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला. रुग्णालयाचा तपशील तसेच मुलाचे जन्म प्रमाणपत्र मात्र ते दाखवू शकले नाहीत. परंतु हे आपल्याला बायकोनेच सांगितले, असा आव तो आणू लागला. इतकेच नव्हे तर बायको गर्भवती असल्याची छायाचित्रेही त्याने दाखविली. परंतु हे गौडबंगाल उघड होण्यास वेळ लागला नाही.

पहिल्या पतीपासून आपल्याला चार मुली आहेत. आपले दुसरे लग्न झाले. या लग्नापासून पुन्हा मुलगी नको होती. कोणत्याही परिस्थितीत मुलगा हवा होता. परंतु पुन्हा मुलगाच होईल याची खात्री नव्हती. त्यामुळे गर्भवती बनण्याचे नाटक केले. त्याच परिसरात राहणाऱ्या सनीला हे सांगितले. मुलासाठी पैसे देण्याचीही तयारी होती. त्यामुळे पैशाच्या आशेने सनीने चित्रीकरणाचे खोटे कारण सांगून संजनाचे मूल पळविले. या काळात आपण गर्भवती असल्याचे नाटक केले. तब्बल नऊ महिने आपण तसे भासविले. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर आपण काही कारणे सांगून मूल अशक्त असल्याने रुग्णालयात असल्याचे सांगितले. नवऱ्यानेही त्यावर विश्वास ठेवला. तीन महिन्यानंतर मूल घरी आणले. नवराही आनंदीत झाला होता. त्याचे बारसेही करायचे होते.. पण.. आशा सांगू लागली.

‘कहानी’ या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने गर्भवती असल्याचे केलेले नाटकही हुबेहूब असेच. परंतु आशाने कथन केलेली ही खरी कहानी ऐकून पोलीसही चक्रावले..

nishant.sarvankar @expressindia.com

@ndsarwankar