तीन महिन्यांत किरकोळ कारवाई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासह वाहतूक विनाअडथळा पुढे सरकावी या उद्देशाने पोलिसांनी घातलेली वेगमर्यादा आणि ती मोडल्याबद्दलची कारवाई कागदावरच असल्याचे चित्र आहे.

द्रुतगती महामार्गावरील दुभाजकाच्या शेजारील पहिल्या मार्गिकेचा (लेन) वापर केल्यास वाहनाचा वेग ताशी ८० किलोमीटरपेक्षा कमी नसावा अशा सूचना महामार्ग पोलिसांनी मार्च महिन्यात जारी केल्या होत्या. ही सूचना मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची तजवीज करण्यात आली होती. अनेकदा अवजड वाहने, मालमोटारी पहिल्या मार्गिकेतून कासवगतीने धावतात. परिणामी मागून धावणाऱ्या वाहनांचा वेग आपोआप मंदावतो. पुढे जाण्यासाठी या वाहनांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या मार्गिकेत शिरावे लागते आणि या प्रयत्नात अपघात होण्याची दाट शक्यता असते. यामुळेच पहिल्या मार्गिकेतून धावणाऱ्या वाहनांसाठी ही वेगमर्यादा घालण्यात आली होती.

हाती असलेले स्पीड कॅमेरे आणि ताफ्यातील वाहनांचा उपयोग करून महामार्ग पोलीस या वेगमर्यादेचे पालन वाहनचालक करतात का हे पाहणार होते. एखाद्या वाहनाने वेगमर्यादा मोडली की पुढल्या टोल नाक्यावर संबंधित वाहन अडवून दंडात्मक कारवाई केली जाणार होती. मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये अवघ्या दहा ते पंधरा वाहनांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

महामार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. पुढल्या काळात ती प्रभावीपणे राबविली जाईल.