मुंबई : फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वेवरील एमयूटीपीतील प्रकल्पांसाठी किरकोळ आर्थिक तरतूद, जोगेश्वरी टर्मिनसची घोषणा व पादचारी पुलांसाठी १८० कोटी रुपये दिल्यानंतर आता सुरू असलेल्या व प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांसाठी पुन्हा भरघोस निधीची गरज आहे. शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबई रेल्वेला काय मिळणार याकडे ७५ लाख प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्यासाठी अंधेरी ते विरारदरम्यान फलाटांचे काम केले जात आहे. त्यासाठी निधीची गरज असून अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. याशिवाय मध्य रेल्वेने बदलापूर, अंबरनाथसाठीही १५ डबा लोकल चालवण्याचे प्रस्तावित केले आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला मंजुरीसोबतच काही निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय गेल्या अर्थसंकल्पात जोगेश्वरी टर्मिनसची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याला निधीची गरज असून तेव्हाच प्रकल्प पुढे सरकू शकतो. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही अर्थसंकल्पात काही तरतूद होऊ शकते.

मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एमयूटीपी-२, ३ आणि ३ ए साठी सुमारे ५७८ कोटी रुपयांची किरकोळ तरतूद फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात केली होती. यात गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या एमयूटीपी-२ साठी २२४ कोटी ९२ लाख रुपये मिळाले होते. यात रखडलेले ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग हे प्रकल्प असून ते अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. तर एमयूटीपी-३ ला २८३ कोटी ७८ लाख रुपये आणि एमयूटीपी-३ ए साठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. एमयूटीपी-३ हा १० हजार ९४७ कोटी रुपयांचा प्रकल्प असून ऐरोली ते कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन मार्ग यासह अन्य काही प्रकल्प आहेत. यातील एकही प्रकल्प पुढे सरकू शकलेला नाही. तर एमयूटीपी-३ ए या ५४ हजार कोटी रुपयांपैकी ३३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मार्च २०१९ मध्ये मंजुरी मिळाली होती. यातील प्रकल्पांना अद्याप सुरुवात होणे बाकी आहे. यात वातानुकूलित लोकल, बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग, कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग, कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग यासह अन्य प्रकल्प आहेत. त्यालाही झालेल्या किरकोळ तरतुदीनंतर या वेळी एमयूटीपी प्रकल्पांसाठी आणखी आर्थिक तरतूद मिळाली, तर प्रकल्प पुढे सरकतील, असेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या अर्थसंकल्पातील मुंबईसाठीच्या तरतुदी

गेल्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर ४२ नवीन पादचारी पूल व जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी ८७ लाख तर मध्य रेल्वेला ८० कोटी रुपये मिळाले होते. पश्चिम रेल्वेला चर्चगेट ते विरारमधील ३२ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर एकात्मिक सुरक्षा प्रणालीअंतर्गत सुरक्षा यंत्रणांसाठी २० कोटी रुपये, रुळांजवळ संरक्षक भिंत, जाळ्या बसवणे, वांद्रे स्थानकातील हेरिटेज वास्तूसाठी ५ कोटी रुपये मिळाले होते. पश्चिम रेल्वेवरील ५५ सरकते जिने, १०० लिफ्ट, तिकीट यंत्रणेतील सुधारणांसाठीही १४ कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला होता.