बोईसर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादाची परिणिती ‘रेल रोको’त झाली. यामुळे जवळपास तासभर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी एक महिला आणि पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले.
बोईसर स्थानकात सोमवारी सकाळी लोकल ट्रेन येताच प्रवासी नेहमीप्रमाणे आत शिरले. यादरम्यान पासधारक आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. एका पुरुष आणि महिला प्रवाशात हा वाद झाला. या वादात आणखी काही प्रवाशांनी उडी घेतली. प्रकरण चिघळत गेले आणि काही वेळात काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन रेल रोको केला. प्रवाशांनी वांद्रे- भुज पॅसेंजर ट्रेन रोखून धरली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरु असल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलगाड्या आणि एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या. या आंदोलनामुळे कच्छ एक्स्प्रेसही खोळंबली होती. एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी आणि लहान मुलांना धमकी दिल्याचा आरोपही केला जात आहे. एका ट्विटर युजरने रेल्वे मंत्रालय आणि पोलिसांना टॅग करत हे ट्विट केले आहे.
@RailMinIndia @WesternRly 22956 Kutch express stranded by locals at Boisar kids and females being threatened in train please check the security status my family also travelling @SushmaSwaraj @PMOIndia @CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Nilesh Gala (@NileshGala007) January 29, 2018
तासाभरानंतर पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरुन दूर केले. दोन प्रवाशांमध्ये सुरु झालेल्या या वादाचा फटका पश्चिम रेल्वेवरील हजारो प्रवाशांना बसला. रेल्वे पोलिसांनी ज्या महिला आणि पुरुष प्रवाशात भांडण झाले त्या दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.