मशीद रेल्वे स्थानकातील ३० वर्षांपेक्षाही अधिक जुना पादचारी पूल पाडून नवा बांधला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम रविवार, २ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येईल. त्यासाठी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत सहा तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

त्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते भायखळा दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर लोकल गाडय़ा धावणार नाहीत. या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी मशीद  व सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात लोकल थांबणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा दरम्यानही दोन्ही मार्गावर लोकल धावणार नसून अशाच प्रकारचा दुसरा ब्लॉक १६ डिसेंबर रोजीही घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोह होणार आहे.

मेट्रो विस्कळीत

घाटकोपर-वसरेवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरला पक्षी धडकल्याने विद्युत पुरवठय़ात अडथळा होऊन मेट्रो सेवा शनिवारी दुपारी विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

घाटकोपरहून वसरेवासाठी निघालेली मेट्रो दुपारी ३.०७ च्या सुमारास जागृती नगर स्थानकाजवळ आली असता ओव्हरहेड वायरला एका पक्ष्याची धडक बसली. त्यामुळे ओव्हरहेड वायरला होणाऱ्या विद्युत पुरवठय़ात अडथळा येऊ लागला. परिणामी मेट्रो जागीच थांबली. विद्युत पुरवठा पाच ते सात मिनिटांत सुरळीत झाल्यानंतर ही गाडी जागृती नगर स्थानकात नेण्यात आली. तेथे प्रवाशांना उतरवून ती कारशेडमध्ये तपासणीसाठी नेण्यात आली.