मध्य, पश्चिम रेल्वेच्या सुविधांचे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील उद्वाहन, सरकते जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम यांसह अनेक सेवा-सुविधांचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज, शनिवारी होणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील आठ स्थानकांतील नऊ पादचारी पूल, पश्चिम रेल्वेवरील ४० एटीव्हीएम मशीन आणि मध्य रेल्वेवरील दिवा-पनवेल मेमू गाडी रोह्य़ापर्यंत चालवण्याच्या सेवा शनिवारी सुरू होतील.

बेलापूर, तळोजा, प्रभादेवी, माटुंगा रोड, गोरेगाव, मालाड, विरार रेल्वे स्थानकात प्रत्येकी एक पादचारी पूल, तर जोगेश्वरी स्थानकात दोन पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. वांद्रे टर्मिनस, बोरिवली स्थानकातील एक उद्वाहन आणि अंधेरी स्थानकातील तीन उद्वाहने बसवण्यात आली आहेत. याशिवाय पनवेल स्थानकात अनेक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. त्यांचेही उद्घाटन करण्यात येईल. रोहा, पेण, आपटा ग्रीन स्थानक, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि घाटकोपर स्थानकातील दिव्यांचेही उद्घाटन होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरूनही आजपासून राजधानी

मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज, शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवतील. मुंबईतून सुटणारी ही तिसरी राजधानी एक्स्प्रेस आहे.

या गाडीचे आरक्षण सुरू होताच त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. आधीच्या दोन राजधानी एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गावरून गुजरातमार्गे दिल्लीला जातात. तिसरी राजधानी एक्स्प्रेस कल्याण, नाशिक, भोपाळ, झाशी, आग्रामार्गे दिल्लीला पोहोचेल. मुंबईहून हजरत निजामुद्दीनसाठी (२२२२१) दर बुधवार आणि शनिवारी सीएसएमटी येथून दुपारी २.५० वाजता गाडी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल. हजरत निजामुद्दीनहून मुंबई (२२२२२) ही परतीची गाडी २० जानेवारीपासून सुरू होईल. परतीची राजधानी गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ४.१५वाजता निजामुद्दीनहून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी ११.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीचे आरक्षण १८ जानेवारीपासून सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. राजधानी एक्स्प्रेसला एक फर्स्ट एसी, तीन एसी २ टायर, आठ एसी ३ टायर असे डबे आहेत.

दिवा मेमू गाडी रोह्य़ापर्यंत 

पेण ते रोहा विद्युतीकरण आणि पनवेल स्थानकात दोन सरकते जिने यांचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. १९ जानेवारीपासून दिवा ते पनवेल मेमू गाडी रोह्य़ापर्यंत आणि पुणे ते कर्जत पॅसेंजरही पनवेलमधून सुटणार आहे. त्यांन रेल्वेमंत्री पीयूष गोयल हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.