मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भरुन वाहत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी कुर्ला येथील क्रांती नगर परिसरातील १००० लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १६ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे.

आज दिवसभर मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत काल रात्री पासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत असून पश्चिम रेल्वेही उशीराने धावत आहे.  रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.