बलात्कारानंतर होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एक विवाहित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात आरोपी पीडित महिलेचा दूरचा नातेवाईक आहे. मुंबईमध्ये रहाणाऱ्या या महिलेला भेटण्यासाठी आरोपी तिच्या घरी गेला होता. आरोपीने महिलेला त्याच्यासाठी कॉफी बनवायला सांगितली. महिला किचनमध्ये जाताच त्याने पाठिमागून तिला पकडले.

तिने प्रतिकार सुरु करताच आरोपीने चाकू उचलला व तिच्या हातावर जखम केली. सांगितलेले ऐकले नाही तर गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याची त्याने धमकी दिली व चाकूच्या धाकावर त्याने महिलेवर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

बलात्काराची घटना मार्च महिन्यात घडली. पण समाजात बदनामी होईल. नवरा सोडून जाईल. या भितीपोटी आपण पोलिसात तक्रार दाखल केली नाही असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये म्हटले आहे. बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पीडित महिलेला फोन करुन २ लाख रुपयांची मागणी केली. सदर घटनेचे चित्रीकरण केले असून पैसे दिले नाहीत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्याची त्याने धमकी दिली.

आरोपीच्या फोनकडे महिलेने दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग सुरु केला व चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श करायचा. महिलेना या प्रकारची पोलिसात तक्रार दाखल केली. एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्याला १० जूनपर्यंत तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

जामीन मिळाल्यानंतरही आरोपीने महिलेकडे पैशांसाठी तगादा लावला होता. आरोपी सतत अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत होता. कुटुंबाला बलात्काराबद्दल समजले तर आपल्याला सोडून देतील या भितीपोटी महिलेने १७ जून रोजी रात्री दोनच्या सुमारास फिनाइल पिऊन हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याने या महिलेने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस ही महिला बेशुद्ध होती. बुधवारी पीडित महिलेने सर्व प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्याला सांगितला. पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे.