मुंबई : हवामान विभागाने मुंबई आणि रायगड जिल्ह्यास गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता, प्रत्यक्षात मात्र मुंबई कोरडीच राहिली.

गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या नोंदीनुसार हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रावर ०.१ मिमी, तर कुलाबा केंद्रावर ०.८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच आद्र्रतेचे प्रमाण देखील अधिक होते. गुरुवारी दुपारी पुढील चोवीस तासांसाठी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यात रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (२०० मिमीपेक्षा अधिक) इशारा तसाच ठेवला होता, मात्र गुरुवारी दिवसभरात रायगड जिल्ह्यात पोलादपूर येथे सर्वाधिक ७० मिमी पाऊस पडला.

बुधवारी रात्री राज्यभरात बीड, सोलापूर, अलिबाग, रत्नागिरी, सांताक्रुझ येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. मात्र गुरुवारी दिवसभर राज्यात पावसाचे प्रमाण अगदीच मर्यादित राहिले, तर अनेक ठिकाणी पावसाने दडीच मारली. पावसाच्या अनुपस्थितीचे कारण हवामान विभागाने दिलेले नाही. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या चोवीस तासाच्या इशाऱ्यानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २० सप्टेंबरला किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पुणे, सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडू शकतो.