गुन्हेगारीत कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आघाडीवर

मुंबई : एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर मुंबई असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांवर खापर फोडले जाते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीद्वारे हा निष्कर्ष चुकीचा ठरवला. मुंबईऐवजी कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आदी शहरे गुन्हेगारीत आघाडीवर असल्याचे या ठोकताळ्यावरून स्पष्ट होते, तर मुंबई १६व्या स्थानावर आहे.

२०१८ वर्षांत देशभर घडलेल्या गुन्ह्य़ांचा अभ्यास करून एनसीआरबीने गेल्या आठवडय़ात अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेसह पॉक्सोसारख्या विशेष कायद्यान्वये देशातल्या १९ महानगरांमध्ये आठ लाख दोन हजार २६७ गुन्ह्यंची नोंद झाली. एनसीआरबीने त्या त्या महानगरांतील लोकसंख्येच्या तुलनेत गुन्ह्य़ांचे प्रमाण अभ्यासले. त्यानुसार २०१८ मध्ये  १९ महानगरांमध्ये दर लाख लोकसंख्येमागे ७०४ गुन्हे सरासरी घडले. मुंबईत हे प्रमाण ३०९ इतके भरले. मात्र त्याच वेळी कोचीत दर लाख लोकसंख्येमागे २५८१, दिल्लीत १४५७, सुरतेत १३१७, जयपूरमध्ये १०६५, चेन्नईत ९७८, इंदूर येथे ९५५ गुन्हे घडले. विशेष म्हणजे मुंबईत २०१७च्या तुलनेत १३८३ गुन्हे कमी नोंद झाले.

हिंसक गुन्हे, महिलांविरोधी गुन्हे, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांविरोधातील गुन्हे, सायबर गुन्हे आदींमध्ये मुंबईत नोंद गुन्ह्य़ांची संख्या जास्त असली तरी गुन्ह्य़ांचे प्रमाण मात्र सरासरीपेक्षा फारच कमी असल्याचे ही आकडेवारी सांगते.

हत्या, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, बलात्कार, अपहरण, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, दंगल, हुंडय़ासाठी छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी प्रकार हिंसक गुन्ह्य़ांत मोडतात. महानगरांतील लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी ३५ हिंसक गुन्ह्य़ांची नोंद झाली. मुंबईत हे प्रमाण ३३ इतके आहे.

मुंबईत छेडछाड प्रकरणांचे प्रमाण वगळता बलात्कार, अपहरण, हुंडय़ासाठी पती किंवा सासरच्या मंडळींकडून मानसिक-शारीरिक छळ, हुंडाबळी, पॉक्सो या गुन्हे प्रकारांतील प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे इंटरनेट, विविध अ‍ॅपच्या माध्यमांतून कोटय़वधींचे व्यवहार होत असतात. या पार्श्वभूमीवर अन्य महानगरांच्या तुलनेत मुंबईतील सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही आटोक्यात असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. महानगरांचा विचार करता सायबर गुन्ह्य़ांची नोंद करण्यात बंगळुरू सर्वात आघाडीवर आहे. या शहरात २०१८ मध्ये ५२५३ गुन्ह्य़ांची नोंद केली गेली. त्याच वेळी मुंबईत नोंद गुन्ह्य़ांची संख्या १४८२ इतकी होती. दर लाख लोकसंख्येमागे १९ महानगरांमध्ये सरासरी नऊ गुन्हे घडले. हे प्रमाण बंगळूरुत ६२, लखनौ ३३ आणि जयपूर येथे १४ इतके भरले. मुंबईत हे प्रमाण आठ इतके होते.

महिलाविरोधी गुन्ह्यंचे प्रमाणही कमी

महिलांविरोधातील गुन्ह्य़ांचा विचार केल्यास देशात ४२,१८० गुन्हे नोंद झाले, तर दर लाख लोकसंख्येमागे ७८ गुन्हे, असे प्रमाण निश्चित केले गेले. अन्य १८ महानगरांच्या तुलनेत मुंबईत महिलांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत २०१८ मध्ये ६०५८ महिलांविरोधी गुन्ह्य़ांची नोंद झाली. आधीच्या दोन वर्षांपेक्षा २०१८ मध्ये मुंबईत सुमारे ६०० गुन्हे वाढले. मात्र त्याच वेळी गुन्ह्य़ांचे प्रमाण ७१ इतके भरले. हेच  प्रमाण लखनौमध्ये १९८, दिल्लीत १५५, इंदूर येथे १५४ आणि जयपूर येथे १४० इतके होते.