आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रूशी दोन हात करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति आपली ‘नागरिक’ म्हणून बांधिलकी जपत मुंबईतील सुमारे ४०० शाळांमधील विद्यार्थ्यांनी एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. वीर पत्नी, त्यांची मुले, वीरमाता यांच्याबरोबरच लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या कल्याणाकरिता असलेल्या निधीकरिता तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी जमा करून मुंबईकर विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम ठोकला आहे.
अपंगत्व आलेले जवान तसेच वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नी, मुले, आई-वडील अशा कुटुंबीयांकरिता वैद्यकीय, शैक्षणिक बाबींकरिता या निधीची तरतूद केली जाते. या करिता सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या प्रत्येक विभागाने आपापला खारीचा वाटा उचलणे अपेक्षित आहे. परंतु, राज्यभरात पसरलेल्या शाळांमुळे शालेय शिक्षण विभाग या निधीच्या संकलनात नेहमीच मोठी भूमिका बजावत आला आहे.
निधी संकलनामागे सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी हा हेतू आहेच. तसेच, या निमित्ताने सैनिकांच्या बलिदानाची जाणीव लहान वयातच मुलांना व्हावी, हा उद्देश आहे. परंतु, गेली काही वर्षे या निधीच्या संकलनाच्या कामात मरगळ आली होती. अनेकदा मुलांना दारोदार भटकवून निधीच्या संकलनाकरिता कामाला कशाला लावायचे, असा विचार करून शाळा आपल्याच कोषातून पाच-दहा हजारांची मदत निधीला करत असत. त्यामुळे, या निधीच्या संकलनामागील भूमिकाच हरवत चालली होती. परंतु, गेल्या वर्षी निधीच्या संकलनामागील सकारात्मक भूमिका शाळा आणि विद्यार्थ्यांना नीट समजावून देऊन त्यात त्यांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, यासाठी दक्षिण मुंबई निरीक्षण विभागाने विशेष प्रयत्न केले. त्या करिता मुख्याध्यापकांच्या बैठकाही घेतल्या. अनेक शाळांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या मदतीने निधी संकलनाला हातभार लावला, असे दक्षिण मुंबई विभागाचे निरीक्षक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

* दक्षिण मुंबईतील ४२२ शाळांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमा केलेला हा आतापर्यंतचा विक्रमी निधी आहे.
* या आधी केवळ ७० ते ८० लाख रुपये या निधीकरिता दक्षिण मुंबईतून जमा होत. मात्र, या वर्षी राज्यभरातून ‘सैनिक कल्याण निधी’करिता जमा झालेल्या सुमारे १९ कोटी रुपयांपैकी तब्बल १.२० लाख रुपये हे एकटय़ा दक्षिण विभागातील ४०० शाळांनी उभे केले आहेत.
* उत्तर व पश्चिम विभागांनीही या निधीकरिता प्रत्येकी ७० ते ८० लाख रुपये जमा करून या निधीला हातभार लावला आहे.
* माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेने सर्वाधिक तब्बल पाच लाख रुपये इतका निधी संकलित करून दिला आहे.
* सेंट अ‍ॅन गर्ल्स हायस्कूल (२.३३ लाख), अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल (१.८७ लाख), एसकेएल जैन हायस्कूल (२.२२ लाख), सेंट झेवियर्स स्कूल (३.३० लाख), सेंट जोसेफ स्कूल (२.०८ लाख), सेंट झेवियर्स बॉईज अकॅडमी (३.३० लाख) या शाळांनीही निधी संकलनात मोठा वाटा उचलला आहे.