सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली. विशेषत: उपनगरात पारा अधिक घसरला असून, किमान तापमान १५.३  अंश नोंदविण्यात आले.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या तापमानात घट होत आहे. गेल्या आठवडय़ात कमाल तापमान ३० अंशापेक्षा आणि किमान तापमान २० अंशांपेक्षा अधिक नोंदले जात होते. मात्र सोमवारपासून त्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली.

सांताक्रुझ केंद्रावर बुधवारी १५.३ अंश, तर कुलाबा केंद्रावर १८ अंश किमान तापमान राहिले. उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट दिसून आली. शुक्रवारी तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारत गारठल्याने..

सध्या संपूर्ण उत्तर भारत गारठला असून, काही भागांत थंडीची तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन गारवा असला, तरी कडाक्याच्या थंडीतील अडथळे कायम आहेत. पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

कोकण विभागात सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीखाली गेले आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव वगळता सर्वच ठिकाणी अद्यापही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असले, तरी रात्री किंचित गारवा आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान सरासरीच्या आसपास आहे.

प्रदूषणात वाढ : तापमानात घट होण्याबरोबरच शहर आणि उपनगरांत दोन्ही ठिकाणी प्रदूषणात वाढ होत असून, सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर राहिली. सफरच्या (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) नोंदीनुसार सर्वाधिक प्रदूषण कुलाबा येथे आढळले. या ठिकाणी प्रदूषक घटकाचे (पीएम २.५) प्रमाण ३४८ इतके होते. थंडी, कोरडी हवा आणि आर्द्रता या जोडीला बांधकामे आणि वाढत्या वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईच्या हवेचा स्तर घसरत आहे.