सेमी इंग्रजी वर्ग, स्पोकन इंग्रजीचे धडे, विद्यार्थ्यांना टॅब अशा अनेक आमिषांनंतरही मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मराठी शाळांना उतरती कळाच लागल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत साडेचार हजारांची घट झाल्याचे समोर येत आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांपासून दुरावलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांची पावले पुन्हा शाळांकडे वळवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत असताना प्रत्यक्षात मुंबई महापालिकेच्या कक्षेतील मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाटय़ाने आटत आहे. विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळाले नसल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (२०१७-१८) यंदा (२०१८-१९) मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी संख्येत साडेचार हजारांची घट झाली आहे.

गेल्या वर्षी पालिकेच्या कक्षेत मराठी माध्यमाच्या ३१४ शाळा होत्या आणि एकूण ४२ हजार ५३५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यंदा शाळांची संख्या ३१० तर विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ७०४ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे हे प्रमाण ९ टक्के आहे. मराठी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची परिस्थिती बरी आहे. या माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्याही कमी होत असली तरी मराठी माध्यमापेक्षाही या माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील गळतीचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले आहे.

विद्यार्थीसंख्या

माध्यम      २०१७-१ ८        २०१८-१९

मराठी   ४२ हजार ५३५      ३८ हजार ७०४

हिंदी    ७२ हजार ५६४      ६६ हजार ५७५

उर्दू     ७० हजार १६३      ६८ हजार १७५

इंग्रजी   ३४ हजार ३१       ३३ हजार ३४९