उद्या उद्घाटन; नवोदित कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी निर्मिती

मुख्यमंत्र्यांच्या ‘बाजार हाट’ने धोबीतलावमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत चौकातील पादचारी भुयारी मार्गात होऊ घातलेल्या कलादालनात खोडा घातल्यानंतर शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी काळाघोडा येथे ‘खुले कला दालन’ ‘साकारुन दाखविले’ आहे. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळताच येत्या शनिवार-रविवारी या खुल्या कला दालनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. त्यामुळे नवोदित कलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

विदेशाच्या धर्तीवर कलावंतांना आपल्या आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे यासाठी काळाघोडा परिसरातील के. दुभाष मार्गावर दर शनिवारी आणि रविवारी ‘खुले कला दालन’ सुरू करण्याची संकल्पना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन मांडली होती. ही कल्पना आयुक्तांना आवडल्यामुळे त्यांनी सोमवारी खुल्या कला दालनाला हिरवा कंदिला दाखविला. के. दुभाष मार्गावरुन होणारी वाहतूक शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात आली तरच या दोन दिवशी खुले कला दालन सुरू करता येणार आहे.

त्यामुळे दर शनिवारी आणि रविवारी के. दुभाष मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात यावी यासाठी पालिकेने वाहतूक पोलिसांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. वाहतूक पोलिसांकडूनही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते. त्यामुळे येत्या शनिवारी-रविवारी कलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी खुल्या कला दालनाच्या निमित्ताने व्यासपीठ मिळणार आहे. तर मुंबईकरांना नवोदित कलावंतांच्या कलेचे खुल्या कला दालनात ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडणार आहे.

  • के. दुभाष मार्गावर रस्त्यावर रंगाने १५ बाय १५ आकाराचे ५० चौकोन आखण्यात येणार आहेत.
  • या चौकोनांमध्ये कलावंतांना आपली कला सादर करता येणार आहे.
  • ही १५ बाय १५ जागा कलावंतांना एक दिवसासाठी १०० ते १५० रुपये भूईभाडय़ाने देण्यात येणार आहे.
  • त्यासाठी कलावंतांना पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्जदारास केवळ एक अथवा दोन दिवसांसाठी के. दुभाष मार्गावरील जागेचा वापर करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे.

नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यास व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे खुल्या कला दालनाच्या निमित्ताने त्यांना एक संधी मिळणार आहे.

–  किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय