काळबादेवीत प्रथम प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

मुंबई : मुंबईतल्या गजबजणाऱ्या बाजार परिसरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने ‘सम-विषम’चा अजब तोडगा काढला आहे. यानुसार दिवसाआड आलटून पालटून सम आणि विषम क्रमांकाच्या गाडय़ा उभ्या करू दिल्या जाणार आहेत.

राकेश शुक्ला याच्या जनहित याचिकेद्वारे महात्मा फुले मंडई, भुलेश्वर, मुंबादेवी आणि काळबादेवीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा न्यायालयासमोर आला आहे. सरकार आणि मुंबई महापालिकेला ही कोंडी दूर करण्यासाठी आदेश देण्याची मागणी याचिकेत आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वाहतूक विभागाने हा तोडगा मांडला आहे. या विषयांतील तज्ज्ञांच्या मदतीने वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाने या प्रयोगाला हिरवा कंदील दाखविला असून त्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कितपत सुटला आहे, याबाबतचा अहवाल चार आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहराच्या अन्यच नव्हे तर राज्यभरातही बाजारपेठांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही उपाय अमलात येऊ शकतो.

बुधवारच्या सुनावणीत वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी मांडलेल्या योजनेनुसार बाजार परिसरात येणारे व्यापारी आणि खरेदीसाठी गर्दी करणारे लोक यांना रस्त्याच्या एकाच बाजूला वाहने उभी करता येतील. तीदेखील  एक दिवसाआड वाहनांच्या सम आणि विषम क्रमांकानुसार उभी करता येतील.

पोलीस विभाग, बाजार परिसरातील व्यापारी आणि या विषयांतील तज्ज्ञांच्या विशेष समितीची गेल्या आठवडय़ात बैठक झाली. त्यामध्ये बाजार परिसरातील निमुळत्या रस्त्यांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याचे सगळ्यांनी मान्य केले. बाजार परिसरामध्ये वाहन उभे करण्यास जागाच उपलब्ध नसल्याने या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे खुद्द व्यापाऱ्यांनी मान्य केले. तसेच या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, तेथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि व्यापारावरही त्याचा परिणाम होणार नाही या दृष्टीने काही पर्यायांवर विचार करण्यात आला. तसेच काही पर्यायांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार वाहनांच्या ‘सम आणि विषम क्रमांका’प्रमाणे वाहने उभी करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

याला जोड म्हणून या परिसरात हातगाडय़ांना मज्जाव करणे, टॅक्सी थांब्यासाठी स्वतंत्र जागा देणे, बेकायदा फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवणे आदी कारवायाही केल्या जातील. वाहतूक पोलिसांनी शोधलेल्या तोडग्याबाबत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि गिरीश कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या तोडग्यांच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने वाहतूक पोलिसांना हर प्रकारे सहकार्य करावे, असे आदेश दिले.

या परिसरातील लोकांकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर रस्ते हे कुणाच्या मालकीचे नाहीत. त्यामुळे सरकारने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक पर्यायांची अंमलबजावणी करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दिल्लीचा अर्धवट कित्ता

दिल्लीत ‘सम-विषम’ हा तोडगा आला तो गाडय़ा रस्त्यांवर आणण्याशी संबंधित होता. म्हणजेच दिवसाआड सम आणि विषम क्रमांकाच्या गाडय़ाच आलटून पालटून रस्त्यावर आणण्याची मुभा होती. वाहतूक विभागाच्या या तोडग्यानुसार सर्वच क्रमांकांच्या गाडय़ा रस्त्यावर यायला आडकाठी नाही, फक्त गाडी उभी करण्यासाठी सम आणि विषम क्रमांकाचे बंधन आलटून पालटून राहणार आहे.