प्राध्यापकांची उत्तरपत्रिका तपासण्यास टाळाटाळ

मुंबई विद्यापीठाच्या गेल्या सत्राच्या निकालात झालेल्या गोंधळांनतर आता या सत्राच्या निकालावरही टांगती तलवार आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी प्राध्यापकांकडून टंगळमंगळ करण्यात येत असल्याचे समोर आले असून प्राध्यापकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याबाबत तातडीने सूचना देण्यात याव्यात, असे आदेश उच्चशिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल १० जानेवारीपर्यंत जाहीर करण्याची तंबीही देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचे गेल्या सत्राचे निकाल अनेक तांत्रिक गोंधळांमुळे लांबले. किंबहुना अद्यापही निकालातील घोळ पूर्णपणे निस्तरलेले नाहीत. त्यातच विद्यापीठाच्या या सत्राच्या परीक्षाही आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. मात्र प्राध्यापकांच्या निरुत्साहामुळे या सत्राचे निकाल तरी वेळेत जाहीर होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी नोंदणी झालेले पन्नास टक्केच प्राध्यापक प्रत्यक्षात मूल्यमापनाचे काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या नाहीत तर त्याची जबाबदारी त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याची असेल, असेही उच्च शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तपासणी बाकी: वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी दोन हजार २२४ प्राध्यापकांची नोंदणी झाली होती. मात्र त्यापैकी एक हजार ३९९ प्राध्यापकांनी आतापर्यंत एकही उत्तरपत्रिका तपासली नसल्याचे समोर आले आहे. अजूनपर्यंत वाणिज्य शाखेच्या सहा लाख २२ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यातच उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार निकाल जाहीर करण्यासाठी अवघे आठ दिवस हाती असल्यामुळे दरदिवशी जवळपास ७७ हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण करण्याचे आव्हान विद्यापीठाला पेलावे लागणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आतापर्यंत अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. वाणिज्य शाखेच्या जवळपास साडेसहा लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनही पूर्ण झाले आहे. आतापर्यंत परीक्षा सुरू होत्या. त्याचे नियोजन, पर्यवेक्षण अशी कामेही महाविद्यालयाकडे होती. त्यामुळे काही प्राध्यापक आले नसतील. मात्र सर्व प्राध्यापक काम करत आहेत. या सत्राचे निकाल वेळेतच जाहीर होतील.’  -अर्जुन घाटुळे, परीक्षा विभागाचे संचालक