पहिल्या टप्प्यासाठीच्या करोना लसीकरणासाठी शहरातील आठ केंद्रे सज्ज असून यातील वांद्रे-कुर्ला करोना आरोग्य केंद्र, कूपर आणि राजावाडी या तीन केंद्रांमध्ये लसीकरण सराव फेरी शुक्रवारी व्यवस्थितपणे पार पडली.

सकाळी साधारण नऊ ते बारा या वेळेत या तिन्ही केंद्रावर फेरी घेण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर पाच अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होते. प्रत्येक केंद्रावर रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांची सराव फेरीसाठी समावेश केला होता. आरोग्य कमर्चाऱ्यांना केंद्राने उपलब्ध केलेल्या को-विन (कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स वर्क) या अ‍ॅपद्वारे टोकन देऊन यात लसीकरणाची वेळ, तारीख आणि स्थळ याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर पाठविण्यात आला. त्यानंतर नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी अ‍ॅपमध्ये असलेली माहिती आणि ओळखपत्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. तेथून लसीकरणाच्या कक्षात पाठविले. लस दिल्यानंतर देखरेख कक्षामध्ये २० ते २५ मिनिटे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले.

अ‍ॅपमध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करण्यासाठी वेळ लागत होता, परंतु काही वेळाने सुरळीत सुरू झाले. सध्या २५ रुग्णालयातील कर्मचारी असल्याने फेरी तासाभरात संपली. परंतु प्रत्यक्षात जेव्हा एका दिवशी एक हजार व्यक्ती लसीकरणासाठी येतील. त्यावेळेस योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे जाणवले, असे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या ठाकूर यांनी सांगितले. वांद्रे-कुर्ला संकुलातील  सराव फेरीच्या वेळेस महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समितीच्या अध्यक्ष प्रवीणा मोरजकर आणि केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ. सुधीर वंजे उपस्थित होते.

अ‍ॅपचा वापर कसा करावा, यासाठी आवश्यक इंटरनेटची सुविधा सुरळीत आहे का, अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची तारीख, वेळ आणि केंद्र या माहितीचा संदेश जात आहे का, केंद्रावरील कर्मचाऱ्यांमधील समन्वयाची पाहणी या फेरीत केली असून यासंबंधीची अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आधार कार्डवरून ओळख पटविण्यात अडचण

अ‍ॅपमध्ये लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आधारचा क्रमांक नमूद करण्याची सुविधा आहे. परंतु ही सुविधा काम करत नसल्याने वापरण्यात अडचण येत होती. अ‍ॅपमध्ये अन्य ओळखपत्र दाखवून ओळख पटविण्याची सुविधा आहे. त्यामुळे नोंदणी करता आली. याबाबत संबंधित कंपनीला कळविले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.