विरार लोकलमधून तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली बॅग चोराने परत आणून लोकलमध्ये ठेवून निघून गेल्याची घटना विरार स्थानकात घडली आहे. चोराने एकप्रकारे माणुसकी दाखवल्याचा प्रकारच येथे समोर आला आहे.

तीन महिन्यांपूर्वी गिरगाव येथील प्लाझा सिनेमागृहाचे व्यवस्थापक उमेश सुरेश पवार (रा. टिटवाळा) यांनी २० एप्रिल रोजी चर्चगेट स्थानकावरून ९.५५ वाजताची विरार लोकल पकडली होती. विरार स्थानकात उतरताना लोकलच्या रॅकवरील बॅग घेण्यास गेले असता त्या ठिकाणहून बॅगच लंपास झाल्याचं त्यांना लक्षात आलं. बॅगेत लॅपटॉप, मोबाइल, रोख रक्कम आणि सर्व महत्त्वाची मूळ कागदपत्रे असल्याने ते हादरून गेले. त्यांनी त्वरित रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या कार्यालयात बॅग चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार लिहून घेत तपासाचे आश्वासन दिले. यानंतर उमेश दररोज या घटनेबाबत पोलिसांत विचारणा करायचे. एवढेच नव्हे तर टिटवाळ्याहून विरारला चौकशीसाठी येत होते.

मात्र, पोलिसांची गाडी आश्वासनापुढे जातच नसल्याने ते कंटाळले व त्यांनी दूरध्वनी करणे बंद केले. पण अचानक तीन महिन्यांनंतर १८ जुलै रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान मीनाक्षी राऊत यांचा त्यांना दूरध्वनी आला. त्यामुळे बॅग मिळण्याच्या त्यांचा आशा पल्लवित झाल्या होत्या. आरपीएफने त्यांच्याकडून चोरीच्या घटनेची माहिती घेत, सांगितलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेऊन सहा. उपनिरीक्षक रामदत्त यादव यांनी मीनाक्षी राऊत यांच्या हस्ते उमेश पवार यांना ती बॅग दिली. या वेळी बॅगेत पारपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शालेय प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधारकार्ड, वेगवेगळ्या पाच बँकांची खातेपुस्तक-धनादेश, सिडकोची ओसी फाईल, आदी कागदपत्रे होती. मात्र, त्यांचा मोबाइल व लॅपटॉपसह २२ हजार रोख रक्कम नव्हती. लॅपटॉप, मोबाइल आणि रोख रक्कम मात्र चोराने परत केले नाही, पण मुख्य कागदपत्रे मिळाल्याने उमेश पवार खूप आनंदी झाले.