स्थानकांची इत्थंभूत माहिती, फलाटांवरील सुविधा, अत्यावश्यक सेवा यांचा तपशील मिळणार

‘दादा, मुंबईला जाणारी गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवरून सुटणार’, ‘तिकीट खिडकी कुठे आहे’, ‘प्रसाधनगृह या प्लॅटफॉर्मवर आहे का’.. मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर नवख्याच नाही, तर अगदी मुरलेल्या प्रवाशांकडूनही हे प्रश्न अनेकदा विचारले जातात. प्रवाशांची ही भरकटलेली स्थिती दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने अख्ख्या स्थानकाची इत्थंभूत माहिती त्यांच्या हाती सोपवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे ‘दिशा’ नावाचे अ‍ॅप विकसित केले जात असून पुढील दहा ते पंधरा दिवसांत हे अ‍ॅप प्रवाशांच्या हाती येणार आहे.

प्रवाशांना रेल्वे स्थानकात आल्यानंतर कोणत्याही कारणासाठी कोणालाही काहीच विचारण्याची गरज भासू नये, या दृष्टीने पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने हे अ‍ॅप तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी पुढाकार घेत या अ‍ॅपची संकल्पना विकसित केल्याचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी स्पष्ट केले. आता हे अ‍ॅप एका खासगी अ‍ॅप विकासकाकडून विकसित करून घेतले जात आहे. डिजिटल इंटरफेस ऑफ स्टेशन हेल्प अ‍ॅण्ड अ‍ॅमिनिटीज् (दिशा) असे या अ‍ॅपचे नामकरण करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली.

हे अ‍ॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर ते वापरण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. हे अ‍ॅप गूगल प्लेस्टोअर किंवा आय-टय़ून स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर चालणारे हे अ‍ॅप सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असेल. हळूहळू त्यात इतर भाषांचा समावेश होणार आहे.

प्रवाशांना स्थानकांची इत्थंभूत माहिती मिळावी, हाच हे अ‍ॅप विकसित करण्यामागचा प्रयत्न आहे. अ‍ॅप विकसित करणाऱ्या विकासकांना सर्व माहिती दिली असून पुढील तीन-चार दिवसांत अ‍ॅपच्या चाचण्या सुरू होतील.

सुरुवातीला सर्वच उपनगरीय स्थानकांवर हे अ‍ॅप सुरू करण्यात येईल. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी दिली.

‘दिशा’ काय दाखवणार?

या अ‍ॅपद्वारे वापरकर्त्यांने निवडलेल्या स्थानकाचा छोटेखानी नकाशा त्याला पाहता येणार आहे. या नकाशावर खालील गोष्टी दाखवल्या जातील.

* स्थानकावरील स्टेशन अधीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासनीस, बुकिंग क्लार्क यांची कार्यालये.

* स्थानकात प्रवेश करण्याच्या जागा. पादचारी पूल, भूयारी मार्ग, सरकते जिने, रॅम्प, उद्वाहक

* खानपानासाठीच्या सुविधा. उदाहरणार्थ प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असलेले स्टॉल,वॉटर व्हेंडिंग यंत्रे, फूड प्लाझा, पाणपोया इत्यादी.

* मोठय़ा स्थानकांवर प्रतीक्षालये, अतिथी कक्ष, शयनगृह इत्यादी.

* स्थानकामधील स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहे. यात सशुल्क, डिलक्स, नि:शुल्क आदी प्रसाधनगृहे वेगवेगळी दाखवली जातील.

* तिकीट खिडक्या, तिकीट आरक्षण केंद्रे, एटीव्हीएम, एटीएम यंत्रे, आपत्कालीन वैद्यकीय मदत कक्ष.

* स्थानकाजवळील रिक्षा-टॅक्सी स्टॅण्ड, बस स्थानके, जवळील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये आणि पर्यटनस्थळे.