मुंबईमधील करोना प्रतिबंध लसीचा तुटवडा आणि लसीकरणाचे नियोजन यावरून सध्या सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा लस तुटवडा भरुन काढण्यासाठी परदेशातून लसी मागवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. मुंबईतील लसीकरणासंदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून परदेशातून लसी मागवण्यासंदर्भातील पर्याय तपासून पाहण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिल्याचं आदित्य यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक, फायझर आणि मॉर्डना या कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यता मिळाली आहे. आता मुंबईकरांना यापैकी कोणती लस मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

“करोना लसीकरण मोहीम सुरळीत आणि जास्त प्रभावीपणे पार पडावी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी मुंबईचा पालकमंत्री या नात्याने चर्चा केली. त्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेला परदेशातून (मुंबईकरांसाठी) लसी मागवता येईल का यासंदर्भातील शक्यता तपासून पाहण्यास सांगितलं आहे,” असं आदित्य म्हणाले.

तसेच पुढे बोलताना तांत्रिक बाबींचं ज्ञान नसणाऱ्या लोकांसाठी तसेच कोविनसारखे अ‍ॅप्लिकेशन न वापरता येणाऱ्यांच्या लसीकरणासाठी काय करता येईल याबद्दल आम्ही काम करत आहोत. अशा लोकांनाही लस मिळाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहितीही आदित्य यांनी दिली.

५० ते ६० लाख डोस खरेदी करण्याची तयारी…

लशींचा तुटवडा लक्षात घेऊन पालिकेने ५० ते ६० लाख लसींचे डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. केंद्राकडून उपलब्ध होणारी सीरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस मुंबईकरांना देण्यात येत आहे. मुंबईतील एक कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण व्हावे, यादृष्टीने लसीकरण केंद्रांची संख्या आणि लस देण्याची क्षमता वाढविण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे कधी खासगी रुग्णालयांमधील, तर कधी शासकीय वा पालिकेच्या लसीकरण केंद्रातील लसीकरण थांबवावे लागते.

चर्चेनंतर ठरणार नेमका आकडा…

पहिल्या टप्प्यात मुंबईतील करोनायोद्धय़ांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम पालिकेने हाती घेतली. आता १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईला मोठय़ा प्रमाणावर लसींच्या डोसेसची गरज आहे. मुंबईकरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी आता पालिकेने जागतिक निविदा प्रक्रिया राबवून ५० ते ६० लाख लसींचे डोस खरेदी करण्याबाबत पालिकेतील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. नेमक्या किती मात्रा खरेदी करायच्या याबाबत मंगळवारी अंतिम निर्णय होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

जलदगतीने लसीकरण पूर्ण करणार….

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक, फायझर आणि मॉर्डना या कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यता मिळाली आहे. यापैकी कोणती कंपनी मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करेल हे जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. यासाठी येणारा खर्च आरोग्यासाठी राखून ठेवलेल्या निधीतून करण्यात येईल. लस मिळाल्यानंतर मुंबईकरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.