संदीप आचार्य

लसीकरणाच्या माध्यमातून बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या मिशन ‘इंद्रधनुष’ योजनेत दोन वर्षे वयाखालील बालकांचे व गर्भवती मातांचे २०२० पर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रात अनेक महापालिकांच्या कूर्मगती कारभारामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट गाठता आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

या मोहिमेअंतर्गत देशातील २०१ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रात इंद्रधनुष लसीकरण मोहिमेसाठी २५ जिल्हे व २० महापालिकांची निवड करण्यात आली आहे. चार टप्प्यांतील या मोहिमेत आरोग्य विभागाने २५ जिल्ह्यंपैकी चार जिल्हे वगळता निश्चित केल्यानुसार ९० टक्के लसीकरणाचे काम पूर्ण केले, तर नऊ महापालिकांमध्ये जेमतेम ८० टक्क्यांपर्यंत लसीकरणाचे काम करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

या नऊ महापालिकांमध्ये चंद्रपूर ६६ टक्के, मुंबई ६९ टक्के, औरंगाबाद ७१ टक्के, अकोला ७३ टक्के, वसई विरार ७३ टक्के, लातूर ७४ टक्के, भिवंडी ७६ टक्के, ठाणे ७९ टक्के तर  परभणी ७९ टक्के एवढे लसीकरण करण्यात आले आहे. लातूर, गोंदिया, पालघर व नंदुरबार या चार जिल्ह्यत ७३ ते ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मिशन इंद्रधनुष मोहीम २०१४ साली सुरू करण्यात आली असून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या योजनेत दोन वर्षांखालील बालकांना व गर्भवती महिलांना सात प्रकारचे लसीकरण करण्यात येते.

यात घटसर्प, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ, तसेच काही निवडक राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा याच्या लसी देण्यात येतात. डिसेंबर २०१९ मध्ये तसेच त्यानंतर जानेवारी , फेब्रुवारी आणि मार्च २०२० पर्यंत लसीकरण केले जाणार आहे.

आजघडीला देशात मातामृत्यूदर १३० एवढा आहे, तर महाराष्ट्रात ६१ आहे. भारतात अर्भकमृत्यू दर हा ३३, तर पाच वर्षांखालील बालमृत्यू दर ३९ एवढा आहे. महाराष्ट्रात हाच दर अनुक्रमे १९ व २१ एवढा आहे. हा दर आणखी कमी करण्याला आरोग्य खात्याचे प्राधान्य असून त्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा  प्रयत्न आहे.

-डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक